Belgaum Navratri Festival : आदिशक्‍तीचा जागर आजपासून

नवरात्रौत्‍सवाला प्रारंभ : शहर परिसरातील मंदिरे विद्युत रोषणाईने उजळली
Belgaum Navratri Festival : आदिशक्‍तीचा जागर आजपासून
Published on: 
Updated on: 

बेळगाव : आश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला रविवार, ११ पासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. शहर परिसरात विविध मंदिरांत दुर्गामाता मूर्तीची स्थापना होणार असून मंदिरे विद्युत रोषणाईने उजळली आहेत. दहा दिवस घटस्थापना, ललिता पंचमी, सरस्वती आवाहन, महालक्ष्मी पूजन, महाआरती, दुर्गाष्टमी, पालखी उत्सव, सीमोल्‍लंघन, गरबा दांडिया आदी विविध कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे.

पहिल्या दिवशी दुर्गामातेची प्रतिमा किंवा मूर्तीची प्रतिष्ठापना करून घटस्थापना करण्यात येणार आहे. नवरात्रौत्‍सवात अनेक कुटुंबांत घटस्‍थापना करून देवीची दहा दिवस मनोभावे पूजा केली जाते. काही घरांमध्‍ये नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवण्‍याची परंपरा आहे. शहर उपनगरांतील विविध मंदिरांत नवरात्रौत्‍सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या मंदिरांत शनिवारी पूर्वतयारी जोरात सुरू होती. बाजारपेठेतही फुले व पूजा साहित्‍य खरेदीची लगबग होती.

दक्षिण काशी कपिलेश्‍वर मंदिरात भव्‍य दुर्गामूर्ती बेळगावकरांचे आकर्षण असणार आहे. पाटील गल्‍लीतील सिद्धनाथ जोगेश्‍वरी मंदिरात दसरा महोत्सवानिमित्त अभिषेक, कुंकूमार्चन, पुष्पपूजा, पालखी मिरवणूक होणार आहे. शहापूर येथील अंबाबाई देवस्थानात सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजातर्फे नऊ दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वडगाव, खासबाग येथील नामदेव शिंपी समाज व अंबाबाई देवस्थानच्या वतीने रोज सायंकाळी ७.३० वाजता महाआरती व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जत्तीमठ, अनंतशयन गल्ली येथील रेणुका मंदिर, जालगार गल्ली येथील कालिकादेवी मंदिर येथेही धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. समर्थनगर येथील दुर्गामूर्ती यंदा भाविकांसाठी आकर्षण ठरले आहे.

शहरात विविध ठिकाणी गरबा व दांडिया खेळला जाणार आहे. विविध महिला मंडळे आणि क्‍लबतर्फे गरबा स्‍पर्धेचे आयोजन केले असून टिपऱ्यांचा नाद घुमणार आहे. विविध मंदिरांत देवीची जागर केला जातो. सौंदत्ती यल्‍लम्‍मा मंदिरात दररोज विविध रूपात पूजा बांधली जाणार असून भाविकांच्‍या दर्शनासाठी नेटके नियोजन करण्‍यात आले आहे.

कोणत्या दिवशी कोणता रंग?

नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा अनेक वर्षांपासून आहे. दुर्गामातेलाही नऊ दिवस वेगवेगळ्या रंगांची वस्त्रे परिधान केली जातात. रंगांच्या परंपरेमुळे सर्वांमध्ये एकोपा व समानतेचा संदेश देण्यात येतो. यंदाच्या नवरात्रीत ११ रोजी नारंगी, १२ रोजी पांढरा, १३ रोजी लाल, १४ रोजी निळा, १५ रोजी पिवळा, १६ रोजी हिरवा, १७ रोजी राखाडी, १८ रोजी जांभळा व १९ रोजी मोरपंखी असे रंग आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news