

अंकली : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात येत आहे. चिकोडी व निपाणी तालुक्यातील काही ग्रामपंचायत स्तरावर नैसर्गिक शेती गट सुरू करण्यात आले आहेत. निसर्गावर आधारित शाश्वत शेती प्रणालीला प्रोत्साहन देऊन रसायनमुक्त नैसर्गिक शेतीमालासाठी एकच राष्ट्रीय बॅण्ड तयार करण्यासाठी केंद्र शासनातर्फे योजना राबविण्यात येत आहे. 16 ग्रामपंचायत व्याप्तीतील सुमारे 817 शेतकरी नैसर्गिक शेती फुलवणार असून त्यासाठी 750 एकर क्षेत्रावर उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय नियंत्रण समिती कार्यरत आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातून इच्छुक शेतकऱ्यांना एका एकर क्षेत्रासाठी या अभियानात सहभागी करून घेतले जात असून नैसर्गिक शेती कसण्यासाठी स्थानिक स्तरावर ग्रामपंचायत प्रशासन किंवा कृषी विभागाचे स्थानिक कर्मचारी, तालुकास्तरावर कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा लागतो. या अभियानात ग्रामपंचायतींचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. नैसर्गिक पद्धतीवर आधारित स्थानिक पशुधन शेती पद्धती लोकप्रिय करणे, जमिनीचा पोत सुधारणे, शेतमाल उत्पादनासाठीचा खर्च कमी करणे अशी अभियानाची उद्दिष्ट्ये आहेत.
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत चिकोडी व निपाणी तालुक्यात सर्कल स्तरावर 6 क्लस्टर बनविण्यात आले आहेत. नागरमुन्नोळी विभागात 2 क्लस्टर, सदलगा विभागात 1 क्लस्टर, चिकोडी विभागात 2 क्लस्टर, निपाणी विभागात 1 क्लस्टर अशा 6 क्लस्टरमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. प्रत्येक प्रशिक्षण केंद्रात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि प्रात्यक्षिके विकसित करण्यासाठी 1 शेतकरी मास्टर ट्रेनरही असणार आहेत.
या अभियानांतर्गत सहभागी शेतकरी गटांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येत असून गट समन्वयक व प्रशिक्षकांना नियमानुसार मानधनही देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळण्यासोबतच नैसर्गिक शेतीकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे. नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्चात घट, जमिनीची सुपीकता वाढ, पर्यावरण संरक्षण तसेच आरोग्यदायी अन्ननिर्मितीला चालना मिळणार आहे. या योजनेंतर्गत शेतकरी गटांना प्रोत्साहन भत्ता स्वरूपात सरकारकडून खरीप आणि रब्बी हंगामात प्रत्येकी 2 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.