

बेळगाव : मुतगेतील (ता. बेळगाव) ऐतिहासिक विहिरीचे (बारव) पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. ही विहीर सुमारे 500 वर्षापूर्वीची असल्याचा अंदाज आहे. विहिरीचे संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र बारव मोहीम व इनटॅक (आयएनटीएसीएच) यांच्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे.
येथील ऑफिसर मेस परिसरात जुनी विहीर असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे इनटॅकचे समन्वयक डॉ. विनोद दोड्डण्णावर आणि अन्य मान्यवरांनी विहिरीला भेट देऊन पाहणी केली. कंचवीर मंदिरासमोर असणारी विहीर झुडपामध्ये दडली आहे. विहिरीचे बांधकाम पूर्णपणे दगडात केले आहे. विहिरीची रचना चौकाकृती असून खाली ती गोल आहे. बांधकाम मजबूत असून विहिरीला पायऱ्या आहेत.
गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर याठिकाणी पाहणी करण्यात आली. विहिर सध्या झुडपे, वेली यांनी व्यापली आहे. वेलींच्या विळख्यात विहीर सापडली आहे. त्यामुळे लांबून दिसून येत नाही. विहिरीची पाहणी करण्यात आली. त्यावेळी गावकऱ्यांनी विहीर पुरातन असून सुमारे 500 वर्षापूर्वीची असल्याचा दावा केला. त्यावेळी विहिरीत उतरुन घोडे पाणी पीत असत, याप्रकारची सोय होती, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
डॉ. दोड्डण्णावर यांनी किरण पाटील, उमेश पुरी, पीडीओ बसवंत कडेमनी यांच्यासह पाहणी केली. ग्राम पंचायत व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. येत्या काळात विहिरीची स्वच्छता करण्यात येणार आहे. सध्या या विहिरीचा वापर करण्यात येत नाही. यामुळे परिसरात झुडपे वाढली आहेत. विहिरीचे पुनरुज्जीवन केल्यानंतर विहिरीतील पाण्याचा वापर करता येणार आहे.