Belgaum Sugarcane Crop Fire : कचरा डेपोच्या आगीत ऊस जळून खाक

मुतगेतील शेतकऱ्यांचे नुकसान; कचरा डेपो हटविण्याची ग्रामपंचायतीकडे मागणी
Belgaum Sugarcane Crop Fire
मुतगे : ग्रा. पं.ला निवेदन देण्यासाठी उपस्थित सुनील अष्टेकर, सुरेश चौगुले, कलाप्पा चौगुले, मारुती चौगुले, भाऊराव जाधव.Pudhari
Published on: 
Updated on: 

बेळगाव : मुतगेतील ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे शेजारील शेतातील एक एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेत कलाप्पा चौगुले, मारुती चौगुले आणि सुरेश चौगुले या तीन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कचरा डेपो हटवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली.

संबंधित शेतकऱ्यांच्या शेताला लागूनच ग्रामपंचायतीचा कचरा डेपो आहे. नुकत्याच कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि शेजारील ऊस पिकांची हानी झाली. शेतातील उभा ऊस पूर्णपणे जळून खाक झाला. कचरा डेपो शेतालगत असल्याने तो अन्यत्र हलविण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी यापूर्वी ग्रा. पं.कडे केली होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या घटनेनंतर माजी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मुतगे ग्रा. पं.ला निवेदन सादर केले. जळालेल्या उसाच्या पिकाचा तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना पूर्ण नुकसानभरपाई द्यावी, तसेच शेतालगत असलेला कचरा डेपो त्वरित अन्यत्र हलवावा, अशा मागण्या करण्यात आल्या.

मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास कचरा डेपोमध्ये जमा होणारा सर्व कचरा थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर टाकण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. यावेळी सुरेश चौगुले, कलाप्पा चौगुले, मारुती चौगुले, भाऊराव जाधव यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.