

बेळगाव : पत्नीच्या आईच्या दिवस कार्यासाठी जाण्यावरून पतीने भांडण काढून पत्नीचा निर्घृण खून केला. त्यानंतर स्वतःही घरातच गळफास घेऊन स्वत:चे जीवन संपविले. सदर घटना शुक्रवारी (दि. 9) कित्तूर तालुक्यातील तुरकुर शिग्गेहळ्ळी येथे उघडकीस आली आहे.
यल्लव्वा शिवाप्पा कंबळी (वय 46, रा. तुरकुर शिग्गेहळ्ळी) व शिवाप्पा सन्नबसाप्पा कंबळी (वय 50) अशी मृतांची नावे आहेत. पत्नीचा खून केल्यानंतर शिवाप्पाने गळफास घेऊन आत्महत्या केली. यल्लव्वा हिच्या आईचे तीन दिवसांपूर्वी निधन झाले होते. मेकलमर्डी येथे जाऊन अंत्यविधी करून यल्लव्वा परत घरी आली होती. दिवस कार्य असल्याने ती पुन्हा मेकलमर्डीला जाणार होती. यावरून शिवाप्पा आणि यल्लव्वा यांच्यामध्ये वाद सुरू झाला. रागातून शिवाप्पाने यल्लव्वाच्या मानेवर कोयत्याने वार केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवाप्पा याने तेथेच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कित्तूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.