

जमखंडी : जमखंडी तालुक्यातील कुरुगोड येथे नुकत्याच घडलेल्या खूनप्रकरणाचा तपास पोलिसांनी वेगाने करत पाच संशयितांना अटक केली आहे. जमिनीच्या वादातून सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन मोटरसायकलीही जप्त करण्यात आल्या आहेत.
कुरुगोड येथे सिद्दू मल्लाप्पा बिरादार यांचा लोखंडी रॉडने हल्ला करून खून करण्यात आला होता. सिद्दू बिरादार (वय ३४) यांचा त्यांच्याच चुलत भाऊ श्रीशैल बिरादार याने एक लाख रुपयांची सुपारी देऊन खून केल्याचे उघड झाले आहे.
श्रीशैल मल्लप्पा बिरादार (वय २९, रा. कुरुगोड), रवीशंकर शिवपूजी (वय ३२), बसवराज अप्पासाहेब हगरी (वय २२), आकाश शंकर येल्लूर (वय २१) आणि प्रथमेश संजय महाजन (वय २१, रा. बिल्लूर, ता. जत) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. १४ मे २०२६ रोजी दुपारी सिद्दू बिरादार हे मोटारसायकलवरून फार्महाऊसकडे जात असताना त्यांना चित्रपटातील दृश्याप्रमाणे अडवून लोखंडी सळीने हल्ला करण्यात आला होता.
या घटनेनंतर मृताची आई संगव्वा बिरादार यांनी सावळगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सीपीआय एम. डी. मड्डी आणि उपनिरीक्षक अप्पण्णा ऐगाळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास हाती घेत संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यानंतर हत्येमागील कट उघडकीस आला. महाराष्ट्रातील जत तालुक्यातील बसवराज हगरी याला सुपारी देण्यात आली होती. संशयितांनी सिद्दू बिरादार यांच्यावर तीन दिवस पाळत ठेवून ते शेताकडे जात असताना हल्ला केला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले.