

बेळगाव : हातउसने घेतलेले अडीच हजार रुपये दिले नाहीत, म्हणून एका युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रामदुर्ग तालुक्यातील तुरनूर गावाजवळ शुक्रवारी घडली. घटनेनंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.
लक्ष्मण कल्लाप्पा मुद्देण्णावर (वय 32)असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. केंचाप्पा हनुमंत वज्रमेट्टी(वय 28) असे संशयिताचे नाव आहे. लक्ष्मणने केंचाप्पाकडून अडीच हजार रुपये उसने घेतले होते. केंचाप्पाने पैसे परत मागितले. मात्र लक्ष्मणने देण्यास नकार दिला. उलट पैसे देणार नाही, काय करतोस ते कर, असेही म्हटले. त्यानंतर केंचाप्पाने डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.
मयत आणि संशयित दोघेही चिंचकंडी (ता. रामदुर्ग) गावचे रहिवाशी. शुक्रवारी सकाळी या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर लक्ष्मण हा तुरनूर गावाकडे गेला होता. तेथे जाऊन केंचाप्पाने शिवारात नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. खून केल्यानंतरही संशयित त्याच्याजवळच उभा होता. काही जणांनी त्याला विचारले असता माझे अडीच हजार रुपये घेतले आहेत. तो देण्यास नकार दिला म्हणून खून केला असे सांगत होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.