

बेळगाव : महापालिकेत सेवा बजावणाऱ्या १,१०० कामगारांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन अद्याप देण्यात आले नाही. दिवाळी संपून गेली तरी वेतन न मिळाल्याने संतप्त कामगारांनी शुक्रवारी रात्रीपासून आंदोलन छेडले. एका कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला सहकारी कामगारांनी वाचवले. त्यानंतर मनपा प्रशासाने या कामगारांना सोमवारी वेतन अदा करण्याची ग्वाही दिली आहे.
नियमानुसार महिन्याच्या ७ तारखेपर्यंत वेतन बंधनकारक आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यातील १३ तारीख उलटली तरी पगार न झाल्याने शुक्रवार (दि.१३) रात्रीपासून मनपाच्या ३५० हून अधिक कर्मचाऱ्यांनी सदाशिवनगर स्मशानभूमीच्या बाजूला काम बंद आंदोलन छेडले. शनिवारी सकाळी पर्यावरण अभियंता हनुमंत कलादगी यांनी सोमवारी पगार देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले.
सफाई कर्मचारी पहाटे ५ वाजल्या शहर स्वच्छतेच्या कामाला लागतात. शहर-उपनगरातील रस्ते झाडणे, घरोघरी भेटून कचरा संकलन करणे, गटारसफाई करणे, बसस्थानक आणि सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करणे अशी सर्व कामे स्वच्छता कर्मचारी करतात. सुटी न घेता आपले कर्तव्य बजावत असतात. पगार वेळेत न झाल्याने घरभाडे, किराणा साहित्य, शाळेची फी व दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी हात उसणे पैसे घ्यावे लागले. शुक्रवारी रात्रीपासून कचरावाहू गाडीवर चालक म्हणून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली. त्यांना सफाई कर्मचाऱ्यांची साथ लाभली.
ऐन दिवाळीत कामगार पगाराविना
नुकताच दिवाळी सण झाला. ऐन दिवाळीत पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत ठेकेदाराचे कंत्राट रद्द करावे, अशी मागणी आंदोलनात केली.
जीवन संपवण्याचा प्रयत्न
शुक्रवारपासून आंदोलनाला सुरुवात झाली. शनिवारी सकाळी एका कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलन करणाऱ्यांच्या ही बाब वेळीच लक्षात आल्याने त्या कर्मचाऱ्याचा जीव वाचवला.