भाजपच्या चार नगरसेवकांचा वेगळा गट?

महापालिकेच्या राजकारणात आमदार रमेश जारकीहोळी यांची एंट्री
Belgaum Municipal Corporation Elections
भाजपच्या चार नगरसेवकांचा वेगळा गट?Pudhari File Photo
Published on
Updated on

बेळगाव : महिनाभरानंतर जाहीर झालेल्या महापौर, उपमहापौर निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत. दोनवेळा आपल्याला डावलल्याचा आरोप करत आणि इतर कारणांनी भाजपच्या चार आणि एका अपक्ष नगरसेवकाने वेगळा गट केल्याचे समजते. या पाचजणांनी गोकाकचे आमदार रमेश जारकिहोळी यांची भेट घेत पद मिळाले नाही तर भाजपसोबत राहणार नाही, असा इशारा दिल्याचेही समजते. त्यामुळे, सभागृहात स्पष्ट बहुमत असले तरी यंदाचे महापौरपद पटकावणे तितकेचे सोपे नसल्याचे दिसून येत आहे.

प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टेण्णावर यांनी 15 मार्च रोजी महापौर, उपमहापौर निवडणूक होणार असल्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे, इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरु आहे. सध्या महापालिकेत भाजपकडे 33 नगरसेवक आहेत. तर दोघा अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे, त्यांची संख्या 35 इतकी होते. विरोधी गटाकडे 21 नगरसेवक आहेत. मतदानाचा अधिकार असलेल्या इतर लोकप्रतिनिधींची संख्या धरली तर भाजपकडे 38 आणि विरोधी गटाकडे 25 इतकी संख्याबळ होते. यामध्ये जर राजकीय हालचाली झाल्या आणि भाजपचे काही नगरसेवक विरोधी गटाला मिळाले तर महापालिकेत वेगळे चित्र पहायला मिळू शकते.

यावेळी महापौरपद खुल्या गटासाठी आहे. तर उपमहापौरपद खुल्या गटातील महिला वर्गासाठी आहे. त्यामुळे, भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. नाराज असलेल्या चार नगरसेवकांपैकी दोघांची संधी दोनवेळा हुकली आहे. पहिल्या वेळी चर्चेत असलेल्या नगरसेविकेला डावलून ऐनवेळी शोभा सोमनाचे यांचे नाव महापौरपदासाठी जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी त्या नगरसेविकेला आपली नाराजी लपवता आली नव्हती. दुसर्‍या वेळी आणखी एक ज्येष्ठ नगरसेवकही उपमहापौर पदाच्या रेसमध्ये होता. पण, त्यांनाही डावलल्याची भावना तयार झाली आहे.

सभागृहातील भाजपच्या काही नगरसेवकांत मतभेद आहेत. सर्वसाधारण सभेतही ते उघडकीस आले होते. गेल्या महिन्यात भाजपच्या दोन नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आल्याने धास्ती निर्माण झाली आहे. त्यानंतर महापालिकेच्या एका कर्मचार्‍याने नगरसेवकांविरोधात आरोप करत अधिकारी आणि पालकमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे, नगरसेवकांत धाकधूक आहे. या सार्‍या घडामोडीत वरिष्ठांनी आपल्याकडे लक्ष दिले नाही, अशी भावना नगरसेवकांत तयार झाल्याचे समजते. नाराज नगरसेवकांनी आमदार जारकिहोळी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे, त्यांची महापालिकेच्या राजकारणात एंट्री होण्याची शक्यता आहे. आठ दिवसांत वेगवान घडामोडी घडणार असल्याचे समजते. त्यामुळे, ऐनवेळी महापालिकेत वेगळे चित्र निर्माण झाले तर आश्चर्य वाटणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news