Belgaum Crime: वडिलांना मारून आलोय, अटक करा

अल्पवयीन युवक स्वतःच ठाण्यात हजर : साडेसतरा वर्षाच्या युवकाकडून बापाचा खून
Crime News
Crime NewsPudhari Photo
Published on
Updated on

बेळगाव : दारू पिणाऱ्या वडिलांचा सततचा त्रास, आईला मारहाण, घरच्यांशी भांडण याला वैतागलेल्या साडेसतरा वर्षाच्या युवकाने आपल्या बापाचा डोक्यात फावडे घालून खून केला. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची उद्यमबाग पोलिसांत नोंद झाली आहे. वडिलांना ठार करून आलोय मला अटक करा, असे म्हणत युवक जेव्हा रात्री ठाण्यात गेला तेव्हा पोलिसांनी सुरुवातीला त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र त्याने आग्रह धरल्यानंतर खऱ्या प्रकाराचा उलगडा झाला.

याबाबत माहिती अशी की, उद्यमबाग परिसरात हमाली काम करणारा बाळाप्पा हा सतत दारू पिऊन घरी यायचा. घरी आल्यानंतर तो पत्नीला शिवीगाळ व मारबडव करत असे. यानंतर मुलांशीही भांडण काढून त्यांनाही मारहाण करणे, घरासमोर दंगा करणे, असे प्रकार करत असे.

३० जुलैरोजी तो रात्रीच्या वेळी दारू पिऊन घरी आला. त्याने नेहमीप्रमाणे घरच्यांशी भांडण काढले. उशिरापर्यंत भांडत होता. त्यानंतर तो हॉलमध्ये पडून राहिला होता. त्याच्या साडेसतरा वर्षाच्या मुलाला वडिलांचा राग आला. त्याने रात्री साडेबाराच्या सुमारास घरातील फावडे घेऊन तीनवेळा डोक्यावर वार केला. यामुळे रक्तबंबाळ होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

ठाण्यात हजर, पण विश्वासच नाही

मृत बाळाप्पाचा अल्पवयीन मुलगा कॉलेजमध्ये शिकतो. आपल्या हातून वडिलांचा खून झाल्याचे लक्षात येताच त्याला पश्चाताप झाला. आपण गुन्हा केला आहे, हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो रात्रीच उद्यमबाग पोलीस ठ।ण्यात गेला. त्याने रात्री ड्युटीवर असलेल्या पोलिसांना आपण वडिलांचा खून करून आलोय अटक करा, असे सांगितले.

मात्र उपस्थित पोलीस त्याची अंगकाठी पाहून हसायला लागले. तू काय मारतोस, वडिलांना जा घरी जा, असे सांगू लागले. तो पटवून देण्याचा प्रयत्न करत असतानाही त्याचे सांगणे कोणालाही पटत नव्हते. शेवटी पोलिसांनी खात्री करून घेण्यासाठी त्याच्या परिसरात राहणाऱ्या एका वॉचमनला फोन करून विचारणा केली. त्यावेळी वॉचमनने होय खून झाला आहे, असे सांगताच पोलिसांना धक्का बसला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकारीही दाखल झाले.

पंचनामा करून मुलाला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. उद्यमबागचे पोलीस निरीक्षक महांतेश होसपेट अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news