

बेळगाव ः बैठक आयोजित करूनही दीड तास उशिरा सुरू झाल्यामुळे संतापलेले एमआयएमचे नगरसेवक शाहिदखान पठाण यांनी ठिय्या आंदोलन केले. अखेर महापालिका आयुक्त, स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांनी पुन्हा असा प्रकार होणार नाही, असे सांगत दिलगिरी व्यक्त केली.
महापालिकेच्या सभागृहात बुधवारी (दि. 14) दुपारी 12 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्मार्ट सिटी योजनेतीली सिटीज 2.0 या प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी बैठक होती. त्यामुळे नगरसेवक पठाण हे निर्धारित वेळेत सभागृहात पोचले होते. पण तब्बल दीड तास झाला तरी अधिकारी, महापौर, उपमहापौर बैठकीला येत नसल्यामुळे त्यांनी संतापून ठिय्या आंदोलन सुरू केले.
दीड वाजता अधिकारी सभागृहात आले. त्यावेळी आयुक्त कार्तिक एम. यांनी नगरसेवक पठाण यांना जागेवर बसण्याची विनंती केली. पण, पठाण यांनी त्यांना आणि स्मार्ट सिटी योजनेच्या व्यवस्थापकिय संचालिका कविता वारंगल यांना जाब विचारला. बैठकीची वेळ तुम्हाला पाळता येत नाही तर आयोजन कशाला करता, आम्हाला दुसरी कामे नाहीत का, असा सवाल केला. त्यावेळी अधिकार्यांनी दिलगिरी व्यक्त केली. यापुढे असा प्रकार होणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर बैठक सुरू झाली.
सिटीज 2.0 मध्ये 135 कोटी
स्मार्ट सिटीअंतर्गत शहराची सिटीज 2.0 योजनेत निवड झाली आहे. या योजनेतून 135 कोटी रुपये मंजूर आहे. हा निधी प्रामुख्याने शहर स्वच्छतेसाठी, कचरा प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी यांच्यासह इतर नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.