

बेळगाव : महापालिकेत करण्यात आलेली कन्नड भाषेची सक्ती महापौरांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांच्या वाहनावरील मराठी आणि इंग्रजी अक्षरे हटवून केवळ कन्नडमध्येच फलक लिहिण्यात आला आहे. त्यामुळे बेळगावातील मराठी माणसांची ओळख पुसण्याच्या झालेल्या प्रकाराबाबत दैनिक ‘पुढारी’तून वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून महापौर मंगेश पवार यांनी महापालिकेच्या वाहनाचा त्याग केला आहे.
राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी काढलेल्या कन्नड कारभाराच्या अधिसूचनेच्या नावाखाली महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी महापालिकेत शंभर टक्के कानडीकरणाचा विडा उचलला आहे. त्यांच्यामुळे कन्नडसह मराठी आणि इंग्रजी भाषेतही नामफलक, कागदपत्रे, नोटीस देण्याच्या त्रिभाषा धोरणाला हरताळ फासण्यात आला आहे. महापौरांच्या वाहनावरील तिन्ही भाषेतील फलकही दूर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांकडून कन्नडसक्तीच्या नावाने महापौरांच्या वाहनावरील तीन भाषेतील नामफलक हटविल्यानंतर त्याबाबत 5 जुलै रोजी ‘पुढारी’मध्ये सविस्तर बातमी प्रसिद्ध झाली.
महापौरांच्या वाहनावर आधी भगवा ध्वज होता, तोही ध्वज कन्नडभाषिक महापौर झाल्यानंतर हटवण्यात आला होता. आता सरकारी आदेशाचा आसरा घेत मराठी आणि इंग्रजी अक्षरे हटविली गेली. त्यामुळे महापौर मंगेश पवार नाराज झाले आहेत. महापौरपदी मराठी माणूस असतानाच नामफलकावरील मराठी अक्षरे हटविण्यात आल्याची बाब त्यांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे आठ दिवसांपासून महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांनी महापालिकेचे सरकारी वाहन नाकारून आपल्या स्वतःच्या वाहनातून ये-जा करत आहेत. त्यामुळे दोन्ही सरकारी वाहने महापालिकेसमोर थांबून आहेत.
सरकारी वाहन नसल्यामुळे शहरात फिरत असताना महापालिकेचे कर्मचारीही त्यांच्यासोबत राहात नाहीत. मराठी फलक नसल्यामुळे आपण शहरात सरकारी वाहनातून फिरणे रास्त नाही, असा विचार करून महापौरांनी सरकारी वाहनाचा त्याग केला आहे, अशी माहिती समजते.
महापालिकेत हटवण्यात आलेल्या मराठी भाषेतील फलकांबाबत लोकांत नाराजी दिसून येत असल्यामुळे महापौर आणि भाजपचे नगरसेवक महापालिका आयुक्त शुभा बी. आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याशी चर्चा करणार आहेत. भाषिक अल्पसंख्याक आयोगानुसार मराठीलाही स्थान देण्यात यावे, अशी मागणी ते करण्याची शक्यता आहे, अशी माहितीही मिळाली आहे.