Belgaum News: महापौरांनीही दिला घरचा आहेर!

सीमाप्रश्नी ठरावाबाबत मठाधिशांना उत्तर : सरकारच्या अभिप्रायानंतर होईल निर्णय
Belgaum News: महापौरांनीही दिला घरचा आहेर!
Published on
Updated on

बेळगाव : महापालिकेत कर्नाटक समर्थनार्थ ठराव करण्यासाठी कन्नड संघटना, मठाधीश दबाव घालत असले, तरी महापौरांनी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे सरकारच्या अभिप्रायानुसारच निर्णय घेण्यात येईल, असे सांगून कन्नडिगांना घरचा आहेर दिला आहे. तसे पत्र ठरावासाठी जीव देण्याची भाषा करणाऱ्या नागनूर रुद्राक्षीमठाचे अल्लमप्रभू स्वामी यांना पाठविले आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आहे. यावेळी पहिल्यांदाच भाजपने कन्नड भाषिकांना महापौर आणि उपमहापौरपद दिले आहे. त्यामुळे, मराठीद्वेषावर राजकारण करत आलेल्या कन्नड संघटनांच्या आनंदाला पारावार नव्हता. महापालिकेत म. ए. समितीने २००५ मध्ये केलेल्या सीमाप्रश्नाच्या ठरावाला उत्तर देण्यासाठी भाजपने सभागृहात बेळगाव हा कर्नाटकाचा भाग आहे, सीमावादावर महाजन अहवाल अंतिम आहे, असा ठराव करावा, यासाठी आकाडतांडव करण्यात येत आहे.

महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. पण, कोणीही दाद देत नसल्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून कागाळ्या करण्यात आल्या. त्यांच्याकडूनही आश्वासनापलीकडे काही मिळत नसल्यामुळे प्रादेशिक आयुक्तांना निवेदन देऊन महापालिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर मठाधिशांची बैठक घेऊन महापालिकेच्या नावाने शिमगा करण्यात आला.

मठाधीश अल्लमप्रभू स्वामी यांनी महापालिकेत ठराव झाला नाही तर प्राणत्याग करु, अशी दर्पोक्ती केली होती. त्यांनी या ठरावासंदर्भात महापौर प्रीती कामकर यांना पत्र लिहिले होते. त्यावर उत्तर देताना महापौर कामकर यांनी, सदर ठरावासाठी राज्य सरकारकडून अभिप्राय मागण्यात आला आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे या विषयावर सतर्कता बाळवावी लागते, असे उत्तर पाठविले आहे. महापौरांच्या या पत्रामुळे कन्नड संघटनांचे पित्त खवळले आहे. महापौरांनी कन्नडिगांना घरचा आहेर दिला असून महापौरांना ठराव करायचा नाही, अशी आरोळी ठोकण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news