

बेळगाव : शहर उपनगरात गुरुवारी (दि. 13) होळी सण पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी गल्लोगल्लीत सामूहिक होलिकादहन करण्यात आले. टिमक्या व ढोल वादनाच्या निनादात पूजा करून पोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. शुक्रवारी (दि. 14) शहरात रंगोत्सव साजरा होणार असून त्याची पूर्वतयारी गुरुवारी दिवसभर सुरु होती.
शहर उपनगरात तरुण मंडळांतर्फे होळी कामण्णा मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गल्लोगल्लीत आधीच गोवऱ्या व लाकडे रचण्यात आली होती. तिथे मुलांचे टिमक्या आणि ढोलवादन लक्ष वेधून घेत होते. सायंकाळी महिलांनी होळी कामण्णा मूर्तीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. यावेळी आबालवृद्धांच्या उपस्थितीत गाऱ्हाणे घालून पूजा करण्यात आली. होलिकायै नम हा मंत्र म्हटल्यानंतर होळी पेटविण्यात आली. गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, गवळी गल्ली, पाटील गल्ली, भांदूर गल्ली, ताशीलदार गल्ली, चव्हाट गल्ली खडक गल्ली येथील मंदिरासमोर तसेच उपनगरात विविध मंदिरासमोर सामूहिक होळीचे दहन करण्यात आले.
शहरात शुक्रवारी ( दि.14) धुलीवंदन साजरी होणार असून तरुणाईकडून रंगोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गुरुवारी शहर बाजारपेठेत रंग, पिचकाऱ्या, मुखवटे खरेदीची लगबग होती. ओल्या रंगात चिंब भिजण्यासाठी विविध गल्लीत जलतुषार बसविण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही धुलीवंदनादिवशी जल्लोष पाहायला मिळणार आहे. प्रशासनाने पाण्याची नासाडी टाळून कोरड्या रंगाचा वापर करण्याचे आवाहन केले असले तरी विविध ठिकाणी उंचावर जलतुषार यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे रंगात भिजत तरुणाई थिरकणार आहे. काही तरुण मंडळांनी टँकरची मागणी केल्याने उत्साहाला उधाण येणार आहे.