

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असलेला काकती मार्कंडेय सहकारी साखर कारखाना अखेर सहकारी तत्त्वावरच चालविण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. काही दिवसांपासून कारखाना लीजवर देण्याच्या हालचाली होत्या. पण संचालक मंडळाने हा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकारी तत्वावरच चालविण्याचा निर्धार केला.
मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. २४) रामभाऊ पोतदार नगरीत झाली. कारखाना लीजवर देण्याबरोबरच अनेक विषयांवर सभेत सविस्तर चर्चा झाली. रामभाऊ पोतदार, गुरुअण्णा कुट्रे, शट्टुपाण्णा पाटील, गंगाधर शानभाग, यल्लोजी पिंगट यांनी बेळगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सहकारी तत्त्वावर साखर कारखाना असावा, यासाठी पुढाकार घेतला. गावोगावी जाऊन भागभांडवल जमा केले. त्यांच्या पुढाकारामुळे सरकारकडून ११३ एकर जमीन मिळाली व कारखाना उभा राहिला.
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते २०१९ मध्ये कारखान्याने पहिल्या गाळपाला चालना देण्यात आली. त्यानंतर कारखाना २०२३ पर्यंत सुरळीत चालला. पण, त्यानंतर आर्थिक संकटामुळे दोन वर्षे कारखाना बंद करावा लागला. या दरम्यान कारखाना लीजवर देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या. पण, कारखाना लीजवर गेला तर शेतकऱ्यांचे हित साधता येणार नाही, अशीही भूमिका काही संचालक आणि सभासदांनी व्यक्त केली.
अविनाश पोतदार यांच्या पुढाकाराने आता दोन वर्षे बंद पडलेला मार्कंडेय सरकारी साखर कारखाना सहकारी तत्त्वावरच सुरू होणार आहे. कारखाना लीजवर देणार नाही, यावर आज व्यवस्थापकीय संचालक झुबिउल्ला के. आणि माजी अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी शिक्कामोर्तब केले. कारखाना लीजवर दिला तर शेतकऱ्यांचे हित साधता येणार नाही, असे झुबिउल्ला यांनी सांगितले.
घाळी कंपनीचा पुढाकार
मार्कंडेय सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी पी. जी. घाळी कंपनीने पुढाकार घेतला आहे. पोतदार यांच्या प्रयत्नामुळे त्यांनी कारखान्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असून, शेतकऱ्यांचा हा कारखाना शेतकऱ्यांकडेच राहावा, यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे दै. ‘पुढारी’ला सांगितले.
..तर कारखान्याला मोठा दिलासा
काकती येथे वन खात्याच्या जमिनीवर मार्कंडेय सहकारी साखर कारखाना उभा आहे. पण, वन खात्याला कारखान्याने आपली खानापूर तालुक्यातील आमगाव येथील जागा हस्तांतरीत केली. त्यावर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आदेश पारित केला असून आता काकती येथील ११३ एकर जागा कारखान्याच्या नावे व्हावी, यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.