Belgaum Manja Accident : मृत्यू इतका स्वस्त; ना कुणा खेद, ना खंत

मांजाबंदी लागू करण्याकडे काणाडोळा; विद्यार्थ्याचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग
Belgaum Manja Accident : मृत्यू इतका स्वस्त; ना कुणा खेद, ना खंत
Published on: 
Updated on: 

बेळगाव : शहरात जीवघेण्या मांजाच्या विक्रीस बंदी असूनही मांजाविक्री जोमात सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणजे ध्रुव करजुनगी या विद्यार्थ्याचा दुचाकीवरून जाताना बळी गेला आहे. मांजामुळे गळा चिरला जाऊन त्याचा गांधीनगर ओव्हरब्रीजजवळ मृत्यू झाला असून, त्यानंतर पोलिस प्रशासनाला जाग आली आहे. चिनी मांजा येतोय कोठून याची पाळेमुळे शोधण्याचे काम पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून या प्रकरणी एका व्यापाऱ्यास अटक झाली आहे. तथापि, मुळातच अशा घटना घडू नयेत, यासाठी जिल्हा प्रशासन काय करतेय, हा प्रश्र्न आहे.

गुरुवारी सायंकाळी ध्रुव संतोष करजुनगी (वय १९, रा. महांतेशनगर, बेळगाव) हा विद्यार्थी परीक्षेसाठी दुचाकीवरून जात असताना मांजा त्याच्या गळ्यात अडकला आणि गळा चिरला जाऊन त्याचा मृत्यू झाला. गांधीनगर उड्डाणपुलावर चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. महत्वाचे म्हणजे ध्रुवने हेल्मेटही परिधान केले होते. मात्र कोणीतरी मांजाला पतंग बांधून ती उडवत होते. तो मांजा ध्रुवच्या गळ्यात अडकला आणि गळा चिरला जाऊन अतिरक्तस्राने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी मांजा विक्रेत्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. भेंडीबाजार एका व्यापाऱ्याला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे.

याआधीही मांजाच्या दुर्घटना

मांजाने याआधीही मोटारसायकल व सायकलस्वारांचे न बळी घेतले आहे. गुरुवारी सायंकाळच्या घटनेनंतर पोलिसांनी शहरात मांजा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी मार्केटचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची, उपनिरीक्षक पी. जी. गंडव्वगोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेंडीबाजार येथील मुकेश पारसमन जैन (वय ४२) या व्यापाऱ्याला अटक केली. त्याच्या दुकानातून १० बंडल मांजा जप्त करण्यात आला आहे.

बाजारपेठेत मांजा खुलेपणाने

पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, भेंडीबाजार परिसरात मांजाची विक्री होते. या भागात पोलिसांनी फिरुन कारवाई केली. दुचाकीस्वारांचा गळा चिरणाऱ्या चिनी मांजाची विक्री करू नये, असा आदेश यापूर्वीच पोलीस दलाने बजावला आहे. तरीही बाजारपेठेत मांजाची खुलेपणाने विक्री होते.

नाव चीनचे, बनतो देशातेच

दुर्घटना घडल्यानंतर मांजाविक्री बंदीवर चर्चा होते. त्यानंतर विसर पडतो. पोलिसांनी मांजा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई तीव्र करण्याची मागणी केली जात आहे. शिवाय नाव जरी चिनी मांजा असे असले, तरी हा मांजा देशातच तयार होतो. त्यामुळे त्याचे धागेदोरे शोधून काढून मांजाचे उत्पादनच रोखण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news