Belgaum Crime : ‘तो’ युवक पुरोहित; आंतरजातीय लग्न लावल्याबद्दल खून

माणकापूर प्रकरणाचा उलगडा : मुलीच्या लग्नाचा राग, संशयित बापाला पोलिसांकडून अटक
Belgaum Crime : ‘तो’ युवक पुरोहित; आंतरजातीय लग्न लावल्याबद्दल खून
Published on: 
Updated on: 

बेळगाव : माणकापूरच्या शेतात झालेल्या खून प्रकरणाचा उलगडा झाला असून, आपल्या मुलीचा आंतरजातीय विवाह लावून दिल्याच्या रागातून मुलीच्या बापाने लग्न लावणाऱ्या पुरोहिताचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. बापाला पोलिसांनी अटक केली आहे. मुलीने आंतरजातीय विवाह केला आणि तो मंदार रानडे या इचलकरंजीच्या पुरोहिताने लावून दिला, म्हणून बापाने मंदार यांचा पाठलाग करून खून केला. गेल्या शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती.

बाळासो ऊर्फ दीपक अजित मगदूम (वय ४५, रा. शिरदवाड, ता. शिरोळ) असे अटक केलेल्या बापाचे नाव आहे. त्याला सदलगा पोलिसांनी अटक केली आहे. खुनाची घटना माणकापूरच्या उसाच्या मळ्यात घडली होती.

संशयित मगदूमची मुलगी अनुजा ही घरातून न सांगता गेली होती. तिने ओंकात खोत या युवकाशी आंतरजातीय विवाह केला. व्यवसायाने पुरोहित असलेले मंदार रानडे (वय ३५, रा. इचलकंरजी) यांनी हा विवाह लावून दिला होता. याचा राग धरून रानडे यांचा खून केल्याची कबुली मगदूमने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलगी घरातून पळून गेल्यामुळे आपल्याला त्रास झाला. यापुढे इतर आई-वडिलांना असा त्रास होऊ नये, या रागातून आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

३१ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वाबाराच्‍या सुमारास मंदार यांचा भरदिवसा खून करण्‍यात आला होता. प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी बुधवारी शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथून बाळा मगदूमला ताब्यात घेतले. कारवाईत पोलिस निरीक्षक विश्वनाथ चौगला, उपनिरीक्षक बसगौडा नेरली, सहायक उपनिरीक्षक एस. एल. बाडकर, हवालदार एस. एन. बडोदे, एस. ए. जमखोळी, यू. एम. कांबळे आणि कल्लाप्पा मधुर यांनी भाग घेतला.

हल्लेखोराने लग्नाच्या बहाण्याने घेतले बोलावून

मंदार रानडे हे पौरोहित्याचा व्यवसाय करतात. त्यांनीच आंतरजातीय विवाह लावून दिल्याचे कळल्यानंतर हल्लेखोर दीपकने त्यांना दुसऱ्याच्या मोबाईलवरून कॉल करून, माणकापुरात एक लग्न लावायचे आहे, असे सांगून बोलावून घेतले. मंदार माणकापुरात दुचाकीवरून पोहोचल्यानंतर दीपकने त्यांना एका मळ्यात बोलावले. मंदार मळ्यात पोहोचल्यानंतर दीपकने ओळख विचारून घेतली आणि त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून त्यांच्यावर विळ्याने वार केला. त्याही अवस्थेत मंदार यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दीपकने त्यांच्या गळ्यावर वार करून त्यांचा खून केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.