

बेळगाव : आधी त्या दोघांनी एकमेकांवर प्रेम केले. परंतु, मुलाच्या घरच्यांनी मुलीच्या घरच्यांना सांगून टाकले की आम्ही मुलाचे दुसरीकडे लग्न करणार आहे, तुम्ही तुमच्या मुलीला दुसरा मुलगा बघा. यानंतर पुन्हा लग्न करत नाही, करतो असे म्हणत दोन कुटुंबीयांमध्ये भांडण जुंपले. यातून मुलीच्या आईला व भावाला प्रियकर मुलगा, त्याचे वडील व आई अशा तिघांनी जबर मारहाण केली.
काकतीत नुकत्याच घडलेल्या या अनोख्या प्रेमप्रकरणाची सध्या परिसरात जोरदार चर्चा आहे. या घटनेत मुलीची आई व तिचा भाऊ जखमी झाले आहेत. या प्रकरणी काकती पोलिसांनी यातील प्रियकर मुलगा अभी अशोक पाटील, त्याचे वडील अशोक पाटील व आई गायत्री पाटील (तिघेही रा. लक्ष्मीनगर, दुसरा क्रॉस काकती) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, संशयित प्रियकर अभी याचे फिर्याददार महिलेच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे मुलीचे पालक अभीला लग्न कर, असे सांगत होते. यावेळी अभीच्या पालकांनी आम्ही त्याचे दुसरीकडे लग्न ठरवणार आहोत. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीचे लग्नही दुसरीकडे मुलगा बघून करा, असे सांगत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार घडल्यानंतर अभीची आई गायत्रीने २३ सप्टेंबर रोजी मुलीला आपल्या घरी बोलावून घेतले. आम्ही त्या दिवशी चुकीचे बोललो, तुझ्याशी त्याचे लग्न करणार नाही म्हटल्यानंतर अभीने ही बाब मनाला लावून घेतली आहे. त्यामुळे तू त्याच्याशी लग्न कर. यापुढे आम्ही तुझ्या कुटुंबीयांशी भांडण अथवा तक्रार करणार नाही, असे सांगितले.
हा प्रकार घडल्यानंतर २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मुलीची आई व भाऊ अभीच्या घरी गेले. लग्नाचा विषय तुम्हीच संपवून टाकला आहे. आता पुन्हा माझ्या मुलीला बोलावून का विचारणा करताय, असा प्रश्न केला. यातून वादावादी सुरू झाली. यावेळी अभीचे वडील अशोक यांनी मुलीच्या आईला अर्वाच्च शिवीगाळ करत तुझ्या मुलीशीच माझ्या मुलाचे लग्न करतो, असे म्हणत भांडण काढले. वाद विकोपाला जाऊन संशयित क्रमांक तीन असलेल्या अभीची आई गायत्रीने मुलीच्या आईला घट्ट पकडले व इतर दोघांनी त्यांना मारहाण केली. यानंतर मुलीच्या भावालाही लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यात आई व मुलगा गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी त्यांनी बुधवारी (दि. ३०) काकती पोलिसांत फिर्याद दिली असून प्रियकर मुलासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे पुढील तपास करीत आहेत.