

बेळगाव : एकाच मुलीवर प्रेम असल्याच्या कारणावरुन निर्माण झालेल्या वैमनस्यातून मित्राचा चाकूचे वार करुन खून करणाऱ्या आरोपीला प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्या. मंजुनाथ नायक यांनी बुधवारी हा निकाल दिला. आदित्य महांतेश बाळिकाई (रा. मुरगोड, ता. सौंदत्ती) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून २५ हजार रुपये मृताच्या वडिलांना देण्याचे आदेश दिले आहेत.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी आदित्यने मोहम्मद सोहेल नियाजअहमद कित्तूर (रा. मुरगोड, ता. सौंदत्ती) याचा खून केला होता. या दोघांमध्ये मैत्री होती. दोघांचेही एकाच मुलीवर प्रेम असल्याने त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. संबंधित मुलगी मुरगोडमधील शासकीय कन्नड शाळेजवळील महाविद्यालयात जात असताना आरोपीने तिचे कुणावर प्रेम आहे, अशी विचारणा केली होती. त्यावेळी तिने सोहेलचे नाव सांगितले. यानंतर आरोपी आणि सोहेल यांच्यात यावरुन वाद निर्माण झाला. यातून आदित्यने ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सोहेलला फोन करुन सिगारेट ओढण्याच्या बहाण्याने मुरगोड-तल्लूर रस्त्यावरील वन खात्याच्या टेकडीजवळील चिंचेच्या झाडाजवळ नेले. तेथे पुन्हा त्यांच्यात मुलीवरुन वाद झाला.
संतप्त आदित्यने सोहेलच्या पोटावर, छातीवर चाकूने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सौंदत्ती पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल झाला. तत्कालीन पोलिस निरीक्षक आय. एम. मठपती यांनी प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. पुरावे आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने बुधवारी आरोपी आदित्य बाळिकाईला जन्मठेपेची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. सरकारच्या वतीने ॲड. नारायण अरी यांनी कामकाज पाहिले.