

बेळगाव : किरकोळ वादातून एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना कित्तूर तालुक्यातील देवगावमध्ये मंगळवारी (दि. ५) दुपारी अडीचच्या सुमारास उघडकीस आली. महांतेश संगाप्पा हुंच्चण्णावर (वय ५२, रा. देवगाव) असे मृताचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी प्रकाश कल्लाप्पा कालार याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, देवगावात सध्या जत्रा सुरु आहे. मंगळवारी दुपारी मृत महांतेश संशयिताच्या घरी झोपले होते. तू माझ्या घरी का झोपलास, एवढ्या कारणावरून दोघांत वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर संशयिताने महांतेश यांना घरात पाडून त्यांच्या डोक्यात मोठा दगड टाकला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने मृतदेह घराबाहेर ओढून आणत रस्त्यावर टाकला.
घटनेची माहिती मिळताच राजू पुंडलिक हुंच्चण्णावर यांनी कित्तूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.