

बेळगाव : कार खरेदी प्रकरणातील शिल्लक रकमेच्या देवघेवीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी पार्टीचे आयोजन केले. पार्टीत सर्वांनीच मद्यप्राशन केले अन् कारची उर्वरित रक्कम देण्यावरुन भांडण सुरू झाले. यावेळी मृत राहुल तिप्पाण्णा तळवार (वय २३, रा. तानाजी गल्ली, मजगाव) मध्यस्थी करण्यासाठी गेला. पण, तुला किती मस्ती, असे म्हणत हल्लेखोरांनी तलवार हल्ला करत त्यालाच ठार केले.
या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पाच जणांना अटक केली असून यामध्ये एका अल्पवयीनाचा समावेश आहे. अटक केलेल्या संशयितांमध्ये सूरज रामू सिद्दगवळी (वय २६, रा. जयनगर, मच्छे), योगेश बाबू दोड्डमणी (वय २८, रा. जयनगर, मच्छे), मंजुनाथ सुरेश मळकूर (वय २१, रा. गणपत गल्ली, पिरनवाडी), देमाप्पा तळवार (वय २६, रा. ब्रह्मनगर, पिरनवाडी) व एका अल्पवयीन युवकाचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी, या प्रकरणातील फिर्यादी विरेश हिरेमठ (रा. जनता प्लॉट, जयनगर, मच्छे) याने पहिला संशयित सूरज सिद्दगवळी याच्याकडून एक जुनी कार दोन लाख रुपयांना खरेदी केली होती. एक लाख रुपये देऊन विरेश कार घेऊन गेला होता. परंतु, काही दिवसांनी कार व्यवस्थित नाही माझे पैसे मला परत दे, असा तगादा विरेशने लावला होता. यावेळी सूरजने इतके दिवस तू कार वापरली आहेस. त्यामुळे, ३० हजार कमी करुन ७० हजार देणार, असे सांगितले. यापैकी २० हजाराची रक्कम त्याने विरेशला परतही दिली. परंतु, उर्वरित ५० हजारांची रक्कम देण्यास तो टाळाटाळ करत होता.
कारचा व्यवहार मिटवण्यासाठी बुधवारी (दि. २७) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास मच्छेतील रामेश्वरनगर परिसरात पार्टीचे आयोजन केले होते. पार्टी सुरु असताना सर्वांनी मद्यप्राशन केले होते. त्यानंतर त्यांच्यात व्यवहाराचा विषय निघाला. यावेळी पैसे देण्यावरुन त्यांच्यात चर्चा होण्याऐवजी भांडण सुरु झाले. यावेळी राहुलनेही मध्ये तोंड घातल्याने संशयित हल्लेखोरांनी त्याला बाजूला बोलावून घेतले. पैसे देणाऱ्यापेक्षा तूच जास्त बोलत आहेस. तुला मस्ती आलीय का, अशी विचारणा करत त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या राहुलचा जागीच मृत्यू झाला.
मृताच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नऊजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, येथे सुमारे पंधरा जण असल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी पाच जणांना अटक केली आहे. उर्वरित संशयित मंजू सितीमनी (रा. मजगाव), अभी नायक, भीमशी नायक (दोघेही रा. मजगाव), आकाश दिलीप दोड्डमणी, द्याम्या ऊर्फ हुक्का (रा. ब्रह्मनगर), राम्या (रा. मच्छे), शिवू (रा. बुड्य्रानूर) व अन्य पाच-सहा जणांवरही गुन्हा दाखल झाला आहे.