Belgaum News: भाषिक अल्पसंख्याक समिती स्थापन करा; मध्यवर्ती म. ए. समितीची मागणी

मराठी मतदार याद्या पुरविण्याची विनंती
Belgaum News: भाषिक अल्पसंख्याक समिती स्थापन करा; मध्यवर्ती म. ए. समितीची मागणी
Published on
Updated on

बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हास्तरीय भाषिक अल्पसंख्याक समिती तातडीने स्थापन करावी. तसेच मतदार याद्या मराठी भाषेत प्रकाशित कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर लवकरच समिती स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर आणि माजी महापौर मालोजी अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गुरुवारी (दि. १०) जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली आणि निवेदन सादर केले.

भाषिक अल्पसंख्याकांच्या तक्रारी आणि अडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप समितीची स्थापना झालेली नसल्याने ती लवकरात लवकर स्थापन करावी. समितीसाठी मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रतिनिधींची नावे यापूर्वीच प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. पोलिस आयुक्तांच्या बदलीमुळे समिती स्थापन करता आली नाही. आता ही समिती स्थापन करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रोशन यांनी सांगितले.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसुचनेनुसार मतदार याद्या मराठी भाषेतही प्रसिद्ध कराव्यात. मराठी भाषिक लोकांना निवडणूक प्रक्रियेतील माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी मराठी भाषेतील मतदार यादी महत्त्वाची असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले. यावेळी माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील, अनिल पाटील, अॅड. एम. जी. पाटील, शेखर पाटील यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाषिक अल्पसंख्याक समितीची स्थापना आणि मराठीतील मतदार याद्यांचा मुद्दा प्रशासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news