Belgaum Crime: गुंड लक्ष्मण दड्डीसह चौघांना जन्मठेप

गँगवाडीजवळ सहा वर्षांपूर्वी रिक्षाचालकाचा खून; न्यायालयाकडून साडेनऊ लाखांचा दंडही
Life Imprisonment
Life ImprisonmentPudhari
Published on
Updated on

बेळगाव : दहा वर्षांपूर्वी क्षुल्लक भांडणातून राग धरत सहा वर्षांपूर्वी पाळत ठेवून गँगवाडीजवळ धारदार शस्त्राने वार करून रिक्षाचालकाचा खून केल्याप्रकरणी गुंड लक्ष्मण दड्डीसह चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. द्वितीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गंगाधर के. यांनी हा निकाल दिला.

लक्ष्मण फकीराप्पा दड्डी (वय 45, रा. चव्हाट गल्ली, मुत्यानहट्टी), बसवराज होळेप्पा दड्डी (वय 26, रा. दुर्गादेवी गल्ली, मुत्यानहट्टी), बसवाणी ऊर्फ बसू सिद्धाप्पा नाईक (वय 27, रा. चव्हाट गल्ली, मुत्यानहट्टी) व सवीन सिद्धाप्पा दड्डी (वय 24, रा. बळीगार गल्ली, मुत्यानहट्टी) अशी जन्मठेप झालेल्यांची नावे आहेत. शहाबाज शेरखान पठाण (वय 26, मूळ रा. खंजर गल्ली, बेळगाव, नंतर रा. काकती) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. चौघांना जन्मठेप व 9 लाख 60 हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. पैकी 8 लाख रुपयांची रक्कम मृताच्या आई-वडिलांना द्यावी व या प्रकरणातील फिर्यादी अराफतला 1 लाख 60 हजार रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिला.

30 साक्षीदार

न्यायालयाने 30 साक्षीदार, 128 दस्तावेज तपासले असता हल्लेखोरांनी तीन धारदार शस्त्रांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. त्या आधारे न्यायालयाने हा निकाल दिला. प्रारंभी सुनावणी अकराव्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. गुरुराज शिरोळे यांनी काम पाहिले. यानंतर हा खटला द्वितीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला. तिथे सरकारी वकील म्हणून ॲड. भारती होसमनी यांनी काम पाहिले. शनिवारी निकालादिवशी प्रभारी सरकारी वकील म्हणून ॲड. आर. ए. गडकरी यांनी काम पाहिले.

सहा वर्षांपूर्वी खून

ऑक्टोबर 2020 मध्ये रात्री नऊच्या सुमारास लक्ष्मण दड्डी हा कारमधून जाताना त्याला शहाबाज हा मास्टरशेफ हॉटेलमध्ये असल्याचे दिसून आले. तो आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करत होता. त्यानंतर लक्ष्मणने इतर तिघांना बोलावून घेतले आणि ते चौघेही शहाबाज बाहेर पडेपर्यंत कारमध्ये दबा धरून बसले. शहाबाज व त्याचा मित्र अराफत हे दोघेजण रात्री अकरा वाजता बाहेर पडले. ते दुचाकीवरून जात असताना त्यांना या चौघांनी शेख कॉलेजजवळ अडवले आणि हल्ला केला.

हल्ल्यानंतर शहाबाज जीवाच्या आकांताने पळत सुटला आणि निवृत्त उपअधीक्षकांच्या घरात घुसला; परंतु हल्लेखोरांनी पाठलाग करून त्याच्यावर घरात व नंतर बाहेर आणून कोयता व विळ्याने हल्ला करून जागीच ठार केले. माळमारुती पोलिसांत खुनाची नोंद झाली होती. माळमारुतीचे विद्यमान व तत्कालीन पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी न्यायालयाला आरोपपत्र सादर केले होते.

खुनाची पार्श्वभूमी

जन्मठेप झालेला बसवराज दुधाचा व्यवसाय करत होता. 2016 मध्ये रस्त्याने जाताना बाजूने जाणाऱ्या एका रिक्षामुळे त्याच्या अंगावर घाण पाणी उडाले. त्यामुळे त्याने रिक्षाचालकाला मारहाण केली. खून झालेला शहाबाज हाही रिक्षाचालक होता. त्यानेही रिक्षाचालकाची बाजू घेत बसवराजला मारहाण केली. येथून या दोघांमध्ये वादाची ठिणगी पेटली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news