Laughter Club | लाफ्टर क्लब : ज्येष्ठांसाठी तणावमुक्ती केंद्र

हजारो ज्‍येष्‍ठांना आनंद फुलविण्‍यास मदत
Laughter Club
Laughter Club
Published on
Updated on

​बेळगाव : वयाची साठी ओलांडल्यानंतर येणारे एकाकीपण, शारीरिक व्याधी आणि दैनंदिन आयुष्यातील मानसिक ताणतणाव दूर करून निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदात जगण्यासाठी ज्येष्ठांनी ‘हास्य’ हाच खरा मंत्र मानला आहे. त्यामुळेच शहराशहरांतील लाफ्टर क्लब हे ज्येष्ठांसाठी तणावमुक्तीचे केंद्रे आहेत.

सकाळच्या प्रसन्न वातावरणात एकत्र येत ताणतणाव विसरून मोकळ्या श्वासाने आणि मोठ्या आवाजात हसल्याने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. या क्लबमध्ये केवळ हसणेच नव्हे, एकमेकांच्या सुख-दुःखांची देवाणघेवाण करून एकाकीपणावर मात केली जाते. सामूहिक हास्‍यातून रक्तदाब नियंत्रित राहणे, हृदयविकाराचा धोका कमी होणे आणि मानसिक प्रसन्नता मिळणे असे लाभ होतात.

बेळगावातील या लाफ्टर क्लबना महिला व पुरुष अशा दोन्ही वर्गांतील ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रोज सकाळी ७ ते ८ या वेळेत शेकडो ज्येष्ठ नागरिक एकत्र येतात. लाफ्टर क्लबमध्ये आल्याने औषधांचा वापर कमी झाला असून जगण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ व्यक्त करतात.

नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर अचानक मोकळा मिळालेला वेळ कसा घालवायचा, हा प्रश्न अनेक ज्येष्ठांसमोर असतो. बेळगावात सध्या २५ हून अधिक लाफ्टर क्लब सक्रिय आहेत. कॅम्प परिसरातील उद्यान, धर्मवीर संभाजी उद्यान, सीपीएड मैदान, व्‍हॅक्‍सिन डेपो, रेस कोर्स, मराठा मंदिर, छत्रेवाडा आणि शहापूर परिसरातील प्रमुख उद्यानांमध्ये रोज सकाळी ज्येष्ठांची पावले लाफ्टर क्लबकडे वळतात.

बेळगाव शहरातील लाफ्टर क्लब ज्येष्ठांसाठी कौटुंबिक व्यासपीठ बनले आहेत. हास्‍यातीलचार-पाच प्रकार सादर केले जातात. सकाळी अनेक मैदाने ज्येष्ठांच्या हास्याने फुलून जातात. ज्येष्ठांचे औषधांवरील अवलंबित्व कमी होण्यास लाफ्‍टर क्‍लबमुळे मदत झाली आहे.
विश्‍वास धुराजी, अध्‍यक्ष, बेळगाव जिल्‍हा ज्‍येष्‍ठ नागरिक सोसायटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news