

बेळगाव ः एमबीबीएस आणि अभियांत्रिकी शिक्षण घेणार्या महापालिकेच्या अनुदानातून विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या 123 लॅपटॉपच्या खरेदीत दोष आढळून आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल सादर करावा, असा आदेश महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी दिला आहे. यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे बाहेर निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या 24.10 टक्के अनुदानातून शहरातील विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी आर्थिक मदत करण्यात येते. पण, यंदा या विद्यार्थ्यांना पैसे देण्याऐवजी लॅपटॉप वितरण करण्यात आले आहे. एकूण 123 विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदी करण्यात आले आहेत. त्यासाठी काळी आमराईतील राजेश एंटरप्रायझेस यांना ठेका देण्यात आला.
या कंपनीकडून 123 लॅपटॉप देण्यात आले. एका लॅपटॉपसाठी 48,990 रुपयांचे बिल देण्यात आले. पण, लॅपटॉपच्या बॉक्सवर 35,363 रुपयांची एमआरपी आहे. त्यामुळे, एमआरपीपेक्षा अधिक रक्कम खर्चून कशाच्या आधारावर लॅपटॉप खरेदी केली असा सवाल नगरसेवक शंकर पाटील यांनी लेखा स्थायी समिती बैठकीत उपस्थित केला होता. त्यांनी याबाबत आयुक्त शुभा यांना पत्र दिले. त्यामुळे, अखेर आयुक्तांनी लेखाधिकार्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या 24.10 टक्के अनुदानांतर्गत 123 लॅपटॉप खरेदी करण्याबाबत राजेश एंटरप्रायझेस, काळी आमराई, बेळगाव यांना ठेका देण्यात आला. त्यानुसार, त्यांनी हे लॅपटॉप पुरवले होते आणि 4 जून रोजी झालेल्या स्थायी समितीच्या लेखा समितीच्या बैठकीत सदर लॅपटॉप खरेदीतील त्रुटींवर चर्चा करण्यात आली.
राजेश एंटरप्रायझेसने प्रति 35,363 रुपये किंमतीला 123 लॅपटॉप खरेदी केले आणि त्यांचे बिल 48,990 रुपये आकारले. याशिवाय, खरेदी केलेल्या लॅपटॉप बिलांचे व्हाउचर उपायुक्त (प्रशासन) यांनी प्रमाणित केल्यानंतर ते अदा करण्यात आले. त्यानुसार, राजेश एंटरप्रायझेसमधून खरेदी केलेल्या 123 लॅपटॉपमध्ये दोष आढळून आले आहेत.
लॅपटॉपसाठी खरेदी केलेल्या रकमेत तफावत आढळून आल्याने संबंधितांकडून फाइल्स मिळवून सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्यात यावेत, असे आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
लॅपटॉप खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर महापालिकेत एकच खळबळ माजली आहे. आता या प्रकरणात आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. सोमवारी काही लोकांना बोलावून प्रत्यक्ष चौकशी सुरु झाली आहे. त्यामुळे, या प्रकरणातून आता तरी सत्य बाहेर येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.