

बेळगाव : मालमत्तेच्या वाटणीवरून कुटुंबात सुरू असलेल्या वादाचा बुधवारी थरारक शेवट झाला. माजी सैनिकासह त्यांच्या मुलीची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. घटनेत त्यांचा कारचालकही गंभीर जखमी झाला आहे. माजी सैनिकाच्या भावांनीच हे कृत्य केले असून, भर दिवसा ग्रामपंचायत कार्यालय आवारातच हे दुहेरी हत्याकांड घडले असून, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
रुद्राप्पा शिवणाप्पा कुंदरगी (वय ६७) आणि त्यांची मुलगी शशिकला कुंदरगी (वय २६) अशी मृतांची नावे आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्या कारचालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्राथमिक माहिती आहे. रुद्राप्पा आणि त्यांच्या भावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मालमत्तेच्या वाटणीवरून वाद सुरू होता. ३८ गुंठे जमिनीच्या वाटणीसंदर्भातील कागदपत्रांच्या कामासाठी रुद्राप्पा हे बुधवारी अवरादी ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी शशिकला आणि कारचालकही होता.
रुद्राप्पा ग्रामपंचायत कार्यालयात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे भाऊ बसाप्पा कुंदरगी, संगाप्पा कुंदरगी आणि संगाप्पा यांचा मुलगा मडिवाळप्पा कुंदरगी तेथे आले. मालमत्तेच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर संशयितांनी कुऱ्हाड, कोयता अशा धारदार शस्त्रांनी रुद्राप्पा यांच्यावर हल्ला केला. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
वडिलांवर हल्ला होत असल्याचे पाहून शशिकला त्यांना वाचवण्यासाठी पुढे आली. हल्लेखोरांनी तिच्यावरही धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यांचाही जागीच मृत्यू झाला. हल्ल्यादरम्यान त्यांचा कारचालकही जखमी झाला. ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी तसेच गावकऱ्यांच्या उपस्थितीत हत्याकांड घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले. हल्लेखारांचा तपास सुरू आहे.