बेळगाव : बेळगाव-कोल्हापूर या नव्या रेल्वेमार्गासाठी (ब्रॉडगेज) प्राथमिक सर्वेक्षण सुरू झाले आहे. हा नियोजित रेल्वेमार्ग धारवाड-कोल्हापूर रेल्वे कॉरिडोरचा भाग आहे. बेळगाव मिरज रेल्वे मार्गावरील परकनहट्टी येथून हा रेल्वे मार्ग सुरू होणार असून हुक्केरी, संकेश्वर, कणगला, निपाणी, कागल या गावांना जोडण्यात येणार आहे.
बेळगाव व कोल्हापूर ही दोन महत्त्वाची शहरे या नव्या रेल्वेमागनि जोडली जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांमधील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. शिवाय दोन्ही ठिकाणच्या पर्यटनालाही चांगले दिवस येणार आहेत. बेळगावहून कोल्हापूरला जाण्यासाठी थेट रेल्वेमार्ग नाही. बेळगावहून मिरज व तेथून कोल्हापूरला जावे लागते. किंवा पुणे-बंगळूर महामार्गावरून प्रवास करावा लागतो. या नव्या रेल्वेमार्गामुळे या दोन्ही शहरे जोडली जातील. या नव्या मार्गावरून प्रतितास १६० किमी इतक्या कमाल वेगाने रेल्वे नेता येणार आहे. त्यादृष्टीने रेल्वेमार्गाची निर्मिती केली जाणार आहे. हा मार्ग अस्तित्वात आल्यास बेळगाव-कोल्हापूर प्रवास कमी वेळेत व कमी खर्चात पूर्ण करता येणार आहे.
रेल्वे बोर्डाकडून जानेवारी २०२४ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. बेळगाव कोल्हापूर या नव्या रेल्वेमार्गासाठी पुणे येथील मोनार्क सव्हेयर्स अॅन्ड इंजिनिअरिंग कन्सल्टंट लिमिटेड या कंपनीकडे सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. बेळगाव कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे काम सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्टही निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने रेल्वे बोर्डाकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
प्रत्यक्षात सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणात बेळगाव- कोल्हापूर रेल्वेमार्गाची निर्मिती तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का? याची चाचपणी केली जात आहे. यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांसह उच्च तंज्ञत्रानाचा वापरही केला जात आहे.