

बेळगाव : खासबाग परिसरात असलेल्या एका दुचाकी सर्व्हिस सेंटरला गुरुवारी (दि. १९) सायंकाळी अचानक आग लागली. या आगीत सर्व्हिस सेंटरमधील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
संध्याकाळच्या सुमारास सर्व्हिस सेंटरमध्ये अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीत सर्व्हिस सेंटरमधील दुचाकी दुरुस्तीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, उपकरणे तसेच अन्य वस्तूंचे नुकसान झाले आहे.
आग पसरण्यापूर्वीच अग्निशामक दलाने नियंत्रण मिळविल्याने परिसरातील इतर आस्थापनांना धोका टळला. मात्र, या घटनेत नेमके किती आर्थिक नुकसान झाले, याची माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही. आगीचे नेमके कारणही स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागली की अन्य काही कारण होते, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.