Belgaum News : खरिपात निराशा; रब्‍बी हंगामाची आशा

निपाणी परिसरात कृषी विभागाची जय्‍यत तयारी : गतवर्षीच्या तुलनेत शाळू, गहू क्षेत्रात होणार वाढ
Belgaum News : खरिपात निराशा; रब्‍बी हंगामाची आशा
Published on: 
Updated on: 
मधुकर पाटील

निपाणी : खरीप हंगामातील सुगीचा हंगाम सुरू झाला असून, पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम म्हणावा तसा साधता आला नसला तरी आगामी रब्बी हंगाम जोमाने साधण्यासाठी कृषी विभागाने जय्यत तयारी केली आहे. रब्बी हंगामासाठी आवश्यक बियाण्यांची मागणी निपाणी येथील रयत संपर्क केंद्राने केली असून, पहिल्या टप्प्यात शाळू, गहू आणि हरभरा बियाणे दाखल झाले आहे. सोमवार, दि. ५ पासून शेतकऱ्यांना अनुदानित दरात बियाण्यांचे वितरण करण्यात येणार आहे.

निपाणी परिसरात यंदा २५० हेक्टरवर हरभरा, १०० हेक्टरवर गहू आणि १,५०० हेक्टरवर शाळू पिकाचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा शाळू आणि गहू पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असून, रब्बी हंगाम साधण्यासाठी शेतकरी वर्गही कामाला लागला आहे.रब्बी हंगामातील पीक उत्पादनाच्या अनुषंगाने रयत संपर्क केंद्राने दर्जेदार आणि अधिक उत्पादन देणाऱ्या बियाण्यांची उपलब्धता करून दिली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ५ क्विंटल शाळू बियाणे दाखल झाले असून, दुसऱ्या टप्प्यात आणखी ६० क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. तसेच १५० क्विंटल हरभरा बियाणे दाखल झाले असून, १५ क्विंटल गहू बियाण्याची मागणी करण्यात आली आहे.

परिसरात तंबाखू पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली असली तरी अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी आपली जमीन रिकामी ठेवली आहे. साधारणतः भूमिपूजनाच्या आठवडाभर आधी रब्बी पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात होते. मात्र, सध्या पावसाने उघडीप दिल्याने मशागतीच्या कामांवर परिणाम झाला आहे. खरीप न साधलेल्या बहुतांश क्षेत्राची मशागत यापूर्वीच पूर्ण झाली असून, उर्वरित क्षेत्राची मशागतही शेतकरी पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत.

खरीप हंगामात अपेक्षित उत्पादन मिळाले नसले तरी रब्बी हंगाम चांगला साधेल, अशी आशा शेतकरी वर्गाला आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून आवश्यक मार्गदर्शन व बियाण्यांची उपलब्धता करून देण्यात येत आहे.रयत संपर्क केंद्रामार्फत रब्बी हंगामासाठी मागविण्यात आलेल्या शाळू व हरभरा बियाण्यांसाठी लाभार्थी शेतकऱ्यांना आधारकार्डची झेरॉक्स प्रत देणे अनिवार्य आहे.

रब्बी हंगाम चांगल्या प्रकारे साधता यावा, यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून रब्बी पिकांचे नियोजन, पेरणीपूर्व मशागत, बियाणे निवड आणि पीक व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
-दीपक कौजलगी सहाय्यक कृषी अधिकारी, निपाणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news