

बेळगाव : शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने आधीच अडचणीत आलेल्या तरुणाला फायदा करून देतो, असे सांगत पुन्हा १५ लाखांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. आधीच फसलेल्या या तरुणाची पुन्हा फसवणूक झाल्याने त्याला जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. खानापूर तालुक्यातील मल्लिकार्जुन नामक तरुणाने या प्रकरणी जिल्हा सीईएनमध्ये फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, शेअर मार्केटचे जुजबी ज्ञान असलेल्या तरुणाने यामध्ये रक्कम गुंतवली होती. शिवाय इंट्रा डे मार्केटमध्ये त्याला तोटा सहन करावा लागल्याने त्याचा नाद सोडून दिला होता. परंतु, जानेवारी २०२५ मध्ये त्याच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. सर्व तपशील दिल्यानंतर संबंधीत भामट्याने तुम्ही आम्ही सांगतो त्यानुसार गुंतवणूक करा, तुमचा तोटा भरून निघेल शिवाय नफाही मिळेल, असे आमिष दाखवले. त्याच्यावर विश्वास ठेवून सदर तरुणाने आधी एक लाख गुंतवण्यास सांगितले.
यावर त्याला थोडाफार फायदा मिळवून दिल्यानंतर तरुणाचा विश्वास पटला. त्यामुळे सदर तरुणाने जानेवारी २०२५ ते मे २०२६ या काळात संबंधित भामट्याला टप्प्याटप्प्याने १५ लाख ६३ हजार रुपये पाठवले. यापैकी एक लाख परत मिळाले. परंतु, यानंतर ज्याच्या खात्यावर रक्कम वर्ग केली होती त्याने फोन बंद करून संपर्क तोडला. सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होत नसल्याने आपण फसलो गेल्याचे या तरुणाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने जिल्हा सीईएनकडे फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक सुनीलकुमार नंदिश्वर अधिक तपास करीत आहेत.