

खानापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनी (पाईपलाईन) तसेच पाणी शुद्धीकरण केंद्राच्या आवश्यक दुरुस्ती व देखभाल कामांसाठी शहरातील नळ पाणीपुरवठा पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचे नियोजन करून वापर करावा, असे आवाहन खानापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांनी केले आहे.
नगरपंचायतीकडून प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा यंत्रणेची कार्यक्षमता वाढविणे, भविष्यातील तांत्रिक अडचणी टाळणे आणि नागरिकांना सुरळीत व सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामासाठी गुरुवार दि. २ ते सोमवार दि. ६ जुलै या कालावधीत शहरातील नियमित नळ पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात नागरिकांनी शहरातील उपलब्ध कूपनलिका व इतर पर्यायी जलस्रोतांचा वापर करावा. तसेच आरोग्याच्या दृष्टीने कूपनलिकेचे पाणी थेट न पिता ते उकळून थंड केल्यानंतरच पिण्यासाठी वापरावे, असेही नगरपंचायतीने स्पष्ट केले आहे.
पाणीपुरवठा बंद राहणार असल्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नगरपंचायतीच्या कामात सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांनी केले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच शहराचा नियमित नळ पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.