Belgaum Superstition Case: आत्‍म्‍याच्‍या शांतीसाठी जिवंत कोंबड्याला पुरले

खडकलाट येथील घटना : तपासासाठी पुरलेला मृतदेह काढल्‍यानंतर अघोरी कृत्‍य
Belgaum Superstition Case: आत्‍म्‍याच्‍या शांतीसाठी जिवंत कोंबड्याला पुरले
Published on
Updated on

खडकलाट : आधुनिक जगात विज्ञानाची कास धरण्याऐवजी अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या समाजाचे विदारक वास्तव खडकलाट येथील धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. सहा महिन्यांपूर्वी पत्नीने प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून करून मृतदेह शेतात पुरला होता. राघू गावडे असे त्‍या इसमाचे नाव असून फॉरेन्सिक तपासासाठी पोलिसांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला.

पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानाच काही लोकांनी ‘आत्म्याला शांती मिळावी’ आणि ‘आत्म्याचा वावर टाळावा’, या चुकीच्या आणि काल्पनिक समजुतीतून त्याच खड्ड्यात जिवंत कोंबड्याला पुरले.

हा केवळ कायद्याच्या दृष्टीने गंभीर प्रकार नसून मानवी संवेदनांची केलेली पायमल्ली म्हणावी लागेल. या अमानवीय आणि मागासलेल्या कृत्यामुळे खडकलाटसह परिसरात संतापाची लाट पसरली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई होईलच. पण अशा अनिष्ट प्रथा पसरवणाऱ्या आणि समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवरही पोलिसांनी कठोर कारवाई करावी. गावात तातडीने व्यापक जनजागृती मोहीम राबवून अंधश्रद्धेचा हा वैचारिक खड्डा कायमचा बुजवावा, अशी मागणी जोर धरत आहे.

एका बाजूला खुनासारख्या क्रूर कृत्‍याने राघू गावडे यांच्या देहाची विटंबना झाली असताना दुसरीकडे ६ महिन्यांनंतर पोलिसांच्या उपस्थितीत बाहेर काढलेल्या त्याच मृतदेहाच्या खड्ड्यात आत्म्याच्या शांतीच्या नावाखाली कोंबड्याचा बळी देणे, हा प्रकार मानवी देहाला आणि संपूर्ण मानवतेला कलंकित करणारा आहे. न्यायाची प्रक्रिया सुरू असताना विज्ञान आणि कायद्याची पायमल्ली करून अंधश्रद्धेला खतपाणी घालणे, हे समाजातील विवेक आणि माणुसकी वेशीवर टांगल्यासारखे आहे. अशा विकृत मानसिकतेला कायद्याचा धाक दाखवून कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news