

बेळगाव : राष्ट्रीय महामार्ग ते धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत नियोजित उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यासाठी २७० कोटी रुपयांची निविदा जाहीर केली आहे. ऑगस्टपर्यंत निविदा पूर्ण होणार असून ठेकेदार निश्चित होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. १६) उ़ड्डाणपुलाची आढावा बैठक झाली. यामध्ये सर्व विभागांकडून माहिती घेण्यात आली. सार्वजनिक बांधकाम खात्याने उड्डाणपूल प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी २७० कोटी रुपयांची निविदा जाहीर केली आहे. ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सप्टेंबरमध्ये कंत्राटदाराची नियुक्ती केली जाईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर सप्टेंबरच्या अखेरीस किंवा त्यानंतरच्या दोन महिन्यांत बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रोशन यांनी दिली.
पहिल्या टप्प्यातील निविदेमध्ये प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या विविध सुविधांचे स्थलांतर होणार आहे. त्यामध्ये हेस्कॉमच्या वीजवाहिन्या, पाणीपुरवठा वाहिन्या आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्यांचे स्थलांतर करण्याच्या कामांचा समावेश आहे. या स्थलांतराच्या कामांसाठी सुमारे २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पर्यावरणाशी संबंधित बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी, जिथे शक्य असेल तिथे झाडांचे पुनर्रोपण करून झाडे तोडणे टाळले जाईल. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या झाडांना १ ते २ कि.मी.च्या परिघातील सरकारी जमिनीवर पुनर्रोपित केले जाईल. बांधकाम काळात होणारा व्यत्यय कमी करण्यासाठी, जिल्हा प्रशासनाने पोलिस आयुक्तालय आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या समन्वयाने रहदारी वळवण्याची योजना तयार केली आहे. तात्पुरते रस्ते, बॅरिकेडिंग आणि रहदारी व्यवस्थापन उपाययोजनांसाठी सुमारे ३ कोटी रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला आहे.
प्रकल्पाची अंमलबजावणी करताना लोकांना, व्यापाऱ्यांना आणि इतर संबंधित घटकांना कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी लवकरच एक व्यापक चर्चा बैठक आयोजित केली जाईल, असेही सांगण्यात आले. बैठकीला पोलिस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.