Belgaum drowning incident: 'कपिलेश्‍वर'वर दुर्घटना; दोन भाऊ बुडाले

एकाचा मृतदेह हाती, दुसर्‍याचा शोध सुरू : विहिरीचा कठडा कोसळून अपघात
Belgaum drowning incident: 'कपिलेश्‍वर'वर दुर्घटना; दोन भाऊ बुडाले
Published on
Updated on

बेळगाव : येथील कपिलेश्वर मंदिराच्‍या मागील बाजूस असलेल्या विहिरीची भिंत कोसळून दोन मुले बुडाल्‍याची घटना रविवार, दि. ३ रोजी सकाळी ९ च्या सुमारास घडली. अचानक घडलेल्‍या या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. सदर घटनेनंतर तातडीने त्या मुलांचा शोध घेण्‍यास सुरुवात करण्‍यात आली. एका मुलाचा मृतदेह सापडला असून, दुसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शिवम परशुराम सुंडीकर ( वय ७, रा. जेड गल्ली, शहापूर) आणि परशुराम राजू निलजकर (वय ११, रा. शिवाजीनगर, बेळगाव) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. यामधील शिवमचा मृतदेह सापडला असून परशुराम याचा शोध घेण्यात येत आहे. परशुराम सुंडीकर यांचा मुलगा शिवम व त्यांच्या बहिणीचा मुलगा परशुराम यांच्यासह आणखी दोघेजण कपिलेश्वर विहिरीत पोहोण्यासाठी गेले होते.

पोहल्यानंतर हे सर्वजण भिंतीच्या कठड्यावर बोलत बसले होते. यावेळी अचानक ती भिंत विहिरीत कोसळली. यामुळे पाचजण विहिरीत पडले. यामध्ये शुभम आणि परशुराम यांच्या अंगावरच भिंत कोसळल्यामुळे ते पाण्यात बुडाले तर परशुराम सुंडीकर, संस्‍कृती अमित पाटील (वय १३) व आणखी एक मुलगा हे तिघेही पोहत बाहेर आले. यात ते किरकोळ जखमी झाले. यावेळी जेड गल्ली येथील काहीजण त्या विहिरीत पोहत होते. मात्र, ते बाजूला असल्यामुळे त्यांना काही झाले नाही. काही जणांनी बुडालेल्या मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

या घटनेनंतर तातडीने याची माहिती खडेबाजार पोलिसांना देण्यात आली. पोलिस तसेच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी शोध मोहीम हाती घेतली. त्यानंतर काही वेळात शिवम याचा मृतदेह सापडला. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्‍यात आली. मात्र, परशुरामचा शोध लागला नाही. यावेळी त्‍या मुलांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला.

पप्पा, तुम्ही ग्रेट आहात...

विहिरीच्‍या कठड्यावर बसल्‍यावर आपल्‍या वडिलांशी बोलताना शिवमने पप्‍पा, तुम्‍ही ग्रेट आहात, असे उद्‍गार काढले हाेते. आम्हाला सर्व काही देता असे म्‍हणत शिवमने आपल्‍या गालाचा मुकाही घेतला. पोहायला आल्‍याने तो विहिरीतील महादेव मंदिर जाऊन पाया पडला, असे सांगत शिवमचे वडील परशुराम आक्रोश करत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news