बेळगाव : युवतीशी असभ्य वर्तनप्रकरणी कानडी कंडक्टरला मारहाण

कंडक्टरवर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल; मात्र कन्नडिगांकडून घटनेला भाषिक रंग देण्याचा प्रयत्न
Belgaum News
युवतीशी असभ्य वर्तनप्रकरणी कानडी कंडक्टरला मारहाण केली.Pudhari Photo
Published on
Updated on

बेळगाव ः शुक्रवारी बाळेकुंद्रीजवळ झालेल्या कंडक्टर मारहाण प्रकरणाने शनिवारी वेगळेच वळण घेतले. शुक्रवारी कंडक्टरने मराठीत बोल म्हणून आपल्याला मारहाण केल्याचे सांगत याला भाषिक रंग देण्याचा प्रयत्न केला. परंतु, या कंडक्टरने बसमधील अल्पवयीन युवतीवर आरडाओरड, शिवीगाळ व अश्लील हावभाव केल्याची फिर्याद युवतीने दिल्याने या कंडक्टरविरोधात बाल अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल झाला आहे.

सुळेभावीहून बेळगावला येणार्‍या बसमध्ये प्रवासी होते. यामध्ये अल्पवयीन भाऊ-बहीण होते. यावेळी त्या युवतीने आधी दोन तिकिटे मागितली. परंतु, भावाचा पास आहे म्हटल्यानंतर तिने एकच तिकीट द्या, असे कंडक्टरला सांगितले. यावरूनच कंडक्टरने त्या युवतीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी भावाने व बसमधील अन्य एका तरुणाने कंडक्टरला प्रत्युत्तर दिले. पंत बाळेकुंद्री येथे बस पोहोचल्यानंतर येथे अन्य काही तरुणांनी एकत्रित येत कंडक्टरला जाब विचारला. यातून कंडक्टर एम. एम. हुक्केरी यांना धक्काबुक्कीही केली.

कंडक्टरकडून वेगळेच वळण

अल्पवयीन युवतीसोबत हे वागणे बरे आहे का, असा जाब हे तरुण कंडक्टरला विचारत होते. यावेळी हे सर्व तरुण मराठी भाषिक होते. त्यामुळे ते मराठीमधूनच कंडक्टरला जाब विचारत होते. परंतु, मारहाणीची घटना घडल्यानंतर कंडक्टरने याला वेगळेच वळण दिले. आपल्याला या तरुणांनी मराठी बोल, असे म्हणत मारहाण केल्याचे माध्यमांना सांगितले. त्यामुळे याला कन्नड-मराठी भाषिक वादाचा रंग देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला.

पोलिसांची चोख कामगिरी

कंडक्टरने मारीहाळ पोलिसांत मारहाणीची फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करून घेत रात्रीच चौघांना अटक देखील केली. परंतु, ज्या युवतीसमोर कंडक्टरने शिवीगाळ व अश्लील हावभाव केले होते, तिने आपला अवमान केल्याचे सांगत मारीहाळ पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. ती अल्पवयीन असल्याने पोलिसांनी कंडक्टरविरोधात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यामुळे मारीहाळ पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही बाजूंना न्याय देत चोख कामगिरी बजावली. याला कन्नड-मराठी वाद आल्याने पोलिसांनी या प्रकरणातील तरुणांना बेदम मारहाण केल्याचेही समोर येत आहे. परंतु, पोलिसांनी याला दुजोरा दिला नाही.

कन्नडिगांची कोल्हेकुई

या घटनेत युवतीला व्यवस्थित न बोलल्याचा राग मनात धरून तरुणांनी कंडक्टरला जाब विचारला. येथे मराठी व कन्नड भाषिक वाद अजिबात नसताना कन्नड संघटनांनी मात्र याला भाषिक रंग देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणार्‍या बसेसना लक्ष्य करत बसचालक व वाहकाला काळे फासले. इतक्यावरच न थांबता कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी मारीहाळ पोलिस ठाणे गाठले. कंडक्टरविरोधात घातलेला पोक्सो गुन्हा मागे घ्या, असे म्हणत ठाण्यासमोर धिंगाणा घातला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news