Belgaum Cyber Crime : मदतीचे आमिष; महिलेला ११.३४ लाखांचा गंडा

कागवाडमधील प्रकार; फेसबुकवरील जाहिरातीद्वारे फसवणूक
Cyber Crime
Cyber CrimePudhari
Published on: 
Updated on: 

बेळगाव : गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी कागवाड तालुक्यातील एका महिलेला ११ लाख ३४ हजार रुपयांचा गंडा घातला. फेसबुकवरील जाहिरातीवर विश्वास ठेवून मदतीसाठी संपर्क साधलेल्या महिलेची वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरुन संपर्क साधत फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जिल्हा सायबर गुन्हे ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कौलगुड्ड (ता. कागवाड) येथील ४५ वर्षीय महिलेच्या बाबतीत हा प्रकार घडला. १४ जानेवारी रोजी तिला फेसबुकवर अशोक मल्होत्रा या नावाच्या खात्यावरुन गरजू लोकांना आर्थिक मदत देण्यासंदर्भातील जाहिरात दिसली. आर्थिक मदतीची गरज असणाऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन त्यात करण्यात आले होते. या जाहिरातीला प्रतिसाद देत महिलेने संबंधितांशी संपर्क साधला.

सुरुवातीला दोन लाख रुपये मदत म्हणून देण्याचे आश्वासन देत भामट्यांनी महिलेच्या बँक खात्याची माहिती मागितली. त्यानंतर व्हॉट्स ॲप कॉल करून पैसे खात्यात जमा होण्यासाठी त्यांनी पाठविलेला क्युआर कोड स्कॅन करून ठरावीक रक्कम पाठवण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने ३,१०० रुपये ऑनलाईन भरले. यानंतर वेगवेगळ्या पाच मोबाईल क्रमांकांवरुन महिलेच्या संपर्कात राहून तिला १५ लाख ४० हजार रुपयांची मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ही रक्कम खात्यात जमा होण्यासाठी आणखी पैसे पाठवावे लागतील, असे सांगत भामट्यांनी पैसे भरण्यास भाग पाडले.

महिलेने स्वतःच्या तसेच कुटुंबीयांच्या बँक खात्यांतून वेळोवेळी एकूण ११ लाख ३४ हजार रुपये संबंधितांनी सांगितलेल्या खात्यांवर जमा केले. मात्र, आश्वासन दिलेली मदत मिळाली नाही आणि पाठवलेली रक्कमही परत आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर गुन्हे पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news