

कागवाड : कागवाड तालुक्यात मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे.
कागवाड-शेडबाळ मार्गावरील उप्परवाडीजवळ शेडबाळहून कागवाडकडे भरधाव येणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महानंदा सचिन चौगुले (वय ३८, रा. सावळी, ता. मिरज, जि. सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती सचिन चौगुले (वय ४४) हे गंभीर जखमी झाले असून त्यांनामिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसऱ्या अपघातात कागवाड-शिरगुप्पी मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. विठ्ठल बसाप्पा अक्कीमर्डी (वय ५०, रा. निडगुंदी, ता. रायबाग) असे मृताचे नाव आहे. दोन्ही अपघातांची नोंद कागवाड पोलिस ठाण्यात झाली आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जी. ए. सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सुरू आहे.