Belgaum Financial Fraud : गुंतवणूकदारांना १३३ कोटींचा चुना

जादा परताव्याच्या आमिषाने निपाणीच्या दोन कंपन्यांकडून फसवणूक; १२ जणांवर गुन्हा
Financial Fraud
गुंतवणूकदारांना १३३ कोटींचा चुना
Published on: 
Updated on: 

निपाणी : अधिक व्याज आणि अल्पावधीत दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल १३३ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार निपाणीत उघडकीस आला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये दोन संस्थांच्या माध्यमातून अनेकांना गंडा घालण्यात आला आहे. त्याबद्दल १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी सहा जण एकाच कुटुंबातील आहेत.

विशेष म्हणजे, नाशिकमधील सहा माजी सैनिकांसह त्यांच्या परिचितांनी सुमारे ८० कोटी रुपये गुंतवले आहेत. नंदा तात्यासाहेब पाटील, तात्यासाहेब बाळगोंडा पाटील, मुलगा प्रसाद तात्यासाहेब पाटील, त्याची पत्नी पूनम प्रसाद पाटील,(रा. निंबाळकर कॉलनी, निपाणी), नंदा यांची मुलगी पूनम संदीप शिंपुकडे, पूनमचे पती संदीप शिंपुकडे (रा. श्रीपेवाडी) यांच्यासह सौरभ संजय माळी, अलमप्रभू देसाई, सचिन श्रीनिवास माने, पुनीत सिंह, रवी यादव आणि संदीप माळी अशा एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार : लोनार्स एज्युकेशन अँड ट्रेनिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि नंदा ट्रेडर्स या दोन कंपन्यांनी जुलै २०२३ पासून गुंतवणूक स्वीकारण्यास सुरुवात केली. गुंतवलेल्या रकमेवर आकर्षक लाभांश देण्यासह ठरावीक मुदतीनंतर मूळ रक्कम परत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

चौघांना अटक, जामीन

मुख्य सूत्रधार प्रसाद पाटील वगळता नात्यातील चौघांना पोलिसांनी अटक करून निपाणी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली असल्याची माहिती उपनिरीक्षक रमेश पवार यांनी दिली. प्रसाद पाटीलसह अन्य सात जण फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.