Belgaum murder case: विमा रकमेसाठी वाद; खुनाला फुटली वाट

हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी खूनप्रकरणी पत्नीसह प्रियकराला अटक
Belgaum murder case: विमा रकमेसाठी वाद; खुनाला फुटली वाट
Published on
Updated on

बेळगाव : पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा सलाईनमध्ये कीटकनाशक मिसळून खून केला. यानंतर पतीच्या नावे असलेल्या विम्याची रकमेतील मोठा वाटा आपल्याला पाहिजे, असा तगादा प्रियकराने लावला. याची चर्चा गावात झाली अन्‌ पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर खुनाला वाचा फुटली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी व प्रियकराला अटक केली आहे. सुमा संदीप मंजरगी (४०, रा. घोडगेरी, ता. हुक्केरी) व तिचा प्रियकर पुंडलीक डोंबर (३५, रा. घोडगेरी) अशी संशयिताची नावे आहेत.

१३ मार्च रोजी यात्रेला गेलेला निवृत्त जवान संदीप मंजरगी (४६) यांचा किरकोळ अपघात झाला. डॉक्टर त्यांना घरी जाऊ देणार होते, याच काळात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर अंत्यसंस्कारही पार पडले. परंतु, आता तीन महिन्यांनी हा खून असल्याचा छडा यमकनमर्डीचे पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी लावला आहे. या प्रकरणाची चर्चा अधिक आहे.

चहा दुकानामुळे जवळीक

मंजरगी कुटुंब मूळचे घोडगेरीतील आहे. संदीप हा निवृत्त होऊन आल्यानंतर गावीच पत्नी सुमा व दोन मुलांसह राहत होता. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या शेजारी पुंडलीक डोंबर हा राहायला आला. शेजारी असल्याने संदीप व पुंडलीक यांची ओळख वाढली. त्या दोघांनी हिडकल डॅम येथे चहाचे दुकान टाकले. भागीदारीत व्यवसाय असल्याने त्याची घरी ये-जा वाढली. यातून पुंडलीक व संदीपची पत्नी सुमा यांच्यात जवळीक वाढली. या काळात पुंडलीकने पत्नी सुमाकडूनही पैसे घेतलेच शिवाय तिचा पती संदीपकडूनही कर्जाऊ रक्कम घेतली. पुढे चहाचे दुकान चालले नाही म्हणून बंद केले.

विम्याची आयडिया दोघांची

दोघांचे प्रेमसंबंध सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून संदीपला पत्नीचा व पुंडलीकचा संशय येत होता. यातून त्याचे दारुचे व्यसन वाढले. पुंडलीकने तो दारु पिऊन मरणार आहे, यासाठी आपण त्याचा विमा उतरवुया असे म्हणत तिच्याच पैशातून संदीपचा विमा उतरवला. तो एक कोटी की दोन कोटींचा आहे, हे अद्याप तपासात स्पष्ट झालेले नाही.

अपघातात शोधली संधी

विमा उतरविल्यानंतर काही दिवसांनी संदीपचा किरकोळ अपघात झाला. पुंडलीकने सुमाला आपल्याला हीच संधी असल्याचे सांगत त्याचा अपघाती मृत्यू दाखवावा लागेल, असे सांगितले. संदीपला हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देणार होते त्याच दिवशी तिने आणखी एक दिवस वाढवून घेतला. त्यांनी सलाईनमध्ये कीटकनाशक मिसळले. यामुळे दुसऱ्या दिवशी बरा होऊन घरी जाऊ इच्छिणाऱ्या संदीपचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. उत्तरीय तपासणीतही त्याचीच नोंद झाली.

पैशासाठी भांडणातून प्रकरण उघड

आपले काम फत्ते झाले म्हणून पुंडलीक व सुमा खुश होते. परंतु, विम्याची रक्कम आल्यानंतर त्यातील अमूक इतकी रक्कम आपल्याला पाहिजे, असे म्हणत पुंडलीक सातत्याने सुमाशी भांडण काढत होता. याची गावभर चर्चा होऊ लागली. याची माहिती पोलिस निरीक्षक मुशापुरी यांच्यापर्यंत गेली. नेमके प्रकरण काय आहे, याची चाचपणी करण्यासाठी त्यांनी खोलवर तपास सुरु केल्यानंतर पत्नीने प्रियकरासोबत पतीचा खून केल्याचे समोर आले. शुक्रवारी या दोघांना अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची कारागृहात रवानगी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news