Belgaum Ganesh visarjan : विसर्जन मिरवणूक तब्‍बल ४३ तास

बेळगावच्‍या इतिहासातील उच्‍चांकी वेळ; तिसऱ्या दिवशीही कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षवेधी
Belgaum Ganesh visarjan
Belgaum Ganesh visarjan
Published on: 
Updated on: 

बेळगाव : मंगलमूर्ती मोरयाच्‍या गजरात शहर उपनगरातील सार्वजनिक मंडळांच्‍या श्रीमूर्तींना तिसर्‍या दिवशीही निरोप देण्‍याची लगबग रविवारी (दि. २७) सकाळपर्यंत सुरू असल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी (दि. २६) रात्री बारानंतर ३६ तास उलटल्यावरही मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा उत्‍साह कमी झाला नव्‍हता. रविवारी सकाळी ११.४२ वाजता महापालिकेच्‍या श्रीमूर्तीचे अखेरचे विसर्जन झाल्‍यानंतर विसर्जन सोहळ्‍याची सांगता झाली. बेळगावच्‍या इतिहासात तब्‍बल ४३ तास चाललेली विसर्जन मिरवणूक मात्र उच्‍चांक नोंदवून गेली.

रविवारी सकाळी विसर्जनाच्‍या तिसर्‍या दिवशी विसर्जन मिरवणूक पाहण्‍यासाठी भक्‍तांची गर्दी झाली होती. मिरवणूक मार्गावर ढोलताशा, हलगीचा निनाद, फटाक्‍यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत बाप्‍पांचा विसर्जन सोहळा रंगला होता. ‘गणपती बाप्‍पा मोरया’च्‍या गजरात बाप्‍पांचे दर्शन घेण्‍यासाठी मिरवणूक मार्ग गजबजला होता. शनिवारी रात्री बारापर्यंतही विसर्जन प्रक्रिया पूर्ण न झाल्‍याने यंदा उच्‍चांकी वेळेची नोंद होणार हे नक्‍की झाले होते. रात्री एकनंतर मंडळांचे कार्यकर्ते श्रीमूर्ती समवेत पुढे चालत होते; मात्र कपिलेश्‍वर तलावावर एकेक श्रीमूर्तीला विसर्जन करताना अर्धा ते दोन तास लागत असल्‍याने मिरवणूक धीम्‍या गतीने पुढे सरकत होती. वेळेची पर्वा न करता कार्यकर्त्यांचा उत्‍साहाला मात्र उधाण आले होते. पारंपरिक वाद्यांच्‍या तालावर नृत्‍य केले जात होते.

कपिलेश्‍वर नव्‍या तलावात अधिक उंचीच्‍या श्रीमूर्ती आणल्‍या जात होत्‍या. जुना तलाव आकाराने लहान असल्‍याने सर्व भार नवीन तलावावरच होता. श्रीमूर्ती विसर्जनस्‍थळी आल्‍यानंतर आरती करून क्रेन लावली जात होती; मात्र श्रीमूर्तींच्‍या उंचीमुळे मूर्ती पाण्‍यात पूर्ण बुडण्‍यासाठी अधिक वेळ लागत होता. शनिवारी रात्री बारा वाजता टिळक चौकात असलेल्या श्रीमूर्तींना विसर्जन तलावावर येईपर्यंत तब्‍बल १० ते ११ तास लागले. रात्री एकनंतर रामलिंगखिंड गल्‍लीपासून कपिलेश्‍वर तलावापर्यंत श्रीमूर्ती रांगेत थांबवल्‍या होत्‍या.

रविवारी सकाळी ११.४० वाजता चव्‍हाट गल्‍ली बेळगावच्‍या राजाला निरोप देण्‍यात आला. यानंतर महापौर प्रीती खामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, आयुक्‍त कार्तिक एम., लक्ष्मी निप्पाणीकर, संतोष पेडणेकर, राजू भातकांडे व पालिका कर्मचार्‍यांच्‍या उपस्थितीत महापालिकेच्‍या सार्वजनिक श्रीमूर्तीचे रविवारी सकाळी ११.४२ वाजता विसर्जन करण्‍यात आले. शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता पहिल्‍या श्रीमूर्तीचे विसर्जन झाल्‍यानंतर रविवारी सकाळी ११.४२ पर्यंत तब्‍बल ४३ तास विसर्जन मिरवणूक चालली.

विसर्जन संपताच सफाई

कपिलेश्‍वर येथील दोन्‍ही तलावावर सकाळी पावणे बारा वाजता विसर्जन संपताच महापालिका कर्मचार्‍यांनी सफाई करण्‍यास प्रारंभ केला. मिरवणूक मार्गावर आणि तलाव आवारात मोठ्या प्रमाणात कचरा पडला होता. दुपारी बारानंतर विसर्जन तलाव निर्मनुष्‍य झाला. यानंतर काही वेळातच कर्मचार्‍यांनी सफाई पूर्ण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news