

बेळगाव : हुंचेनहट्टीत (ता. बेळगाव) आर्थिक व्यवहारातून झालेल्या खूनप्रकरणी नऊजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी काहीजणांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे बेळगाव ग्रामीण पोलिसांनी सांगितले.
औषध दुकानात काम करणाऱ्या राहुल तिप्पाण्णा तळवार (वय २३, रा. तानाजी गल्ली, मजगाव) याचा बुधवारी (दि. २७) तलवारीने खून केल्याची घटना उघडकीस आली. यादिवशी त्याला सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास काही तरुणांनी रामेश्वरनगर परिसरात बोलावून घेतले. यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. यातून त्याच्यावर वार करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला.
वाद झाला त्यावेळी अनेक तरुण उपस्थित होते. यापैकी काहींनी त्याच्याशी भांडण काढून हल्ला केल्याचे सांगितले जाते. मृताच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीत नऊजणांची नावे घालून फिर्याद दिली असल्याने या सर्वांवर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, प्रत्यक्ष घटनास्थळी कोण उपस्थित होते, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
रात्री उशिरापर्यंत काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु, अन्य काहीजणांचा शोध सुरु असल्याने त्यांची नावे उघड केली नाहीत. याच्या तपासासाठी तीन पथके तयार केली असून त्याद्वारे संशयितांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.