

बेळगाव : मारिहाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका सराईत चोरट्याला अटक करुन त्याच्याकडून १३४ ग्रॅम सोन्याचे व ५१० ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. विश्वनाथ दुर्गाप्पा मुथूर (वय २६, रा. बेविनमट्टी एस. हावेली, जि. बागलकोट) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शिंदोळीतील महालक्ष्मीनगरमध्ये ९ मे २०२६ रोजी दुपारी एका कुलूपबंद घराचा दरवाजा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला होता. त्यानंतर बेडरुममधील कपाटातील सुमारे ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी मारिहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला होता.
पोलिसांनी विशेष पथक तयार करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दरम्यान, २५ मे रोजी दुपारी शिंदोळी गावातील इंडालनगर परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना खांद्यावर पिशवी घेऊन चाललेल्या विश्वनाथच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने शिंदोळीतील घरफोडीची कबुली दिली.
विश्वनाथचा मरिहाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन तर काकती ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून विविध घरफोड्यांतील अंदाजे १३४ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ५१० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलिस आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त नारायण बरमणी, उपायुक्त निरंजन राजे अर्स, एसीपी गंगाधर बी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ए. आर. पट्टणशेट्टी, चंदशेट्टी, उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद यांच्या पथकाने केली. या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्तांनी संबंधित पथकाचे कौतुक केले आहे.