Belgaum News : हिरेबागेवाडीसह नऊ गावांत उभारणार रस्त्यांचे जाळे

राज्य सरकारची तात्पुरती मंजुरी : भविष्यातील नियोजनबद्ध विकासासाठी उपक्रम
Belgaum News : हिरेबागेवाडीसह नऊ गावांत उभारणार रस्त्यांचे जाळे
Published on: 
Updated on: 

बेळगाव : जिल्ह्यातील हिरेबागेवाडी आणि कुडचीसह नऊ शहरे आणि गावांचा समावेश असलेल्या भौगोलिक माहिती प्रणालीआधारित (जीआयएस) रस्त्यांचे जाळे उभारण्याच्या योजनेला (रोड नेटवर्क ग्रिड प्लॅन) राज्य सरकारने तात्पुरती मंजुरी दिली आहे.

प्रस्तावानुसार या गावांत ३० मीटर रुंद रिंग रोडच्या दोन्ही बाजूंना दोन किलोमीटरचा पट्टा इम्पॅक्ट झोन (प्रभाव क्षेत्र) म्हणून निश्चित करण्यात आला आहे. भविष्यातील निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि पायाभूत सुविधांचा विकास सुनियोजित पद्धतीने व्हावा, हा या योजनेचा उद्देश आहे. ज्या भागात स्थानिक नियोजन क्षेत्रे अद्याप अधिकृतपणे घोषित केलेली नाहीत, तिथे मास्टर प्लॅन तयार करण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.

बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडीसाठी नवीन वस्त्या, लेआऊट्‌स, बांधकाम आणि इतर विकासकामांना मंजुरी देताना या प्रस्तावित रस्ते जाळ्याचा विचार करणे आवश्यक असेल. रायबाग तालुक्यातील कुडचीचा समावेश या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. प्रस्तावित रस्ते जाळ्यामुळे शहराच्या भविष्यातील विस्तारासाठी एक आराखडा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

कुडचीच्या प्रस्तावित रिंग रोडभोवतीचा दोन किलोमीटरचा इम्पॅक्ट झोन जमीनमालक आणि विकासकांसाठी विशेष महत्त्वाचा ठरेल. लागू असलेल्या नियमांच्या अधीन राहून या क्षेत्रात निवासी वसाहती, अपार्टमेंट्स, उंच इमारती, बाजारपेठा, हॉटेल्स, गोदामे, कार्यालये, बँका, सुपर मार्केट्स, वाहनांची विक्री व सेवा केंद्रे, बिझनेस पार्क्स आणि एपीएमसीसारख्या विविध विकासकामांना परवानगी दिली जाऊ शकते.

प्रस्तावित ग्रिड प्लॅनचा हिरेबागेवाडी आणि कुडची व त्यांच्या परिसरातील जमिनीच्या विकासावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो; विशेषतः जसजसा या शहरांचा विस्तार होईल आणि नवीन निवासी, व्यावसायिक व पायाभूत सुविधांचे प्रकल्प उभे राहतील, तसतसे याचे महत्त्व वाढत जाणार आहे. नियोजनबद्ध विकासासाठी याचा फायदा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news