

अंकली : बेळगाव व बागलकोट जिल्ह्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या कृष्णा नदीवरील हिप्परगी बॅरेजच्या २५ वर्षे जुन्या क्रेस्ट गेट्सच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. गेट्सची कार्यक्षमता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन तज्ञांच्या पथकाने तपासणी केली असून बहुतांश गेटस् तातडीने बदलण्याची शिफारस केली आहे.
गेल्या आठवड्यात विजयनगर जिल्ह्यातील होसपेट येथील तुंगभद्रा धरणावरील नवीन क्रेस्ट गेट्सचे उद्घाटन करण्यात आले. त्याच धर्तीवर हिप्परगी बॅरेजचेही नूतनीकरण करण्याची मागणी जोर धरत आहे. हिप्परगी बॅरेजमध्ये गेट क्र. ३ ची दुरुस्ती २०२४ मध्ये तर गेट क्र. २२ ची नवीन स्थापना जानेवारी २०२६ मध्ये करण्यात आली होती. पण उर्वरित गेटस् जुने आणि झिजलेले असल्याने यंदाच्या पावसाळ्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
तांत्रिक अहवालानुसार क्रेस्ट गेटस् दर १५ वर्षांनी बदलणे आवश्यक असते. पण हिप्परगी बॅरेजवरील गेट्सना तब्बल २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. काही गेट्सची मूळ १० मि. मी. जाडी झिजून ४ ते ५ मि. मी. पर्यंत आली आहे. त्यामुळे पाण्याचा वाढता दाब सहन करण्याची त्यांची क्षमता कमी झाली असून गेटस् तुटण्याचा धोका वाढल्याचे तज्ञांनी नमूद केले आहे.
धरणातील सर्व २२ गेट्सपैकी २१ गेट्सच्या नूतनीकरणाची आवश्यकता असल्याचे अधिकृत पथकाने स्पष्ट केले आहे. सध्या दुरुस्तीची कामे सुरू असली तरी बॅरेज व्यवस्थापन कार्यालयात स्वतंत्र तांत्रिक पथक नसून बहुतांश कामे कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून केली जात असल्याबद्दलही चिंता व्यक्त होत आहे. मे महिन्यात हैद्राबाद येथील तज्ञांच्या पथकाने बॅरेजची पाहणी करून सर्व गेट्सची तांत्रिक तपासणी केली. तपासणीत गेट्सना मोठ्याप्रमाणात गंज लागल्याचे आढळून आले. त्यानंतर २२ पैकी २१ क्रेस्ट गेट्सच्या नूतनीकरणासाठी सुमारे ४३ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च तयार करण्यात आला असून त्याबाबत निविदा प्रक्रिया शासकीय स्तरावर सुरू आहे.