

बेळगाव: पुढारी वृत्तसेवा: रस्त्यात कार अडवून रियल इस्टेट व्यावसायिक तरुणावर गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१०) पहाटे चारच्या सुमारास गणेशपूर जवळील हिंदूनगर येथे घडली. प्रफुल बाळकृष्ण पाटील (वय 32, रा. शाहूनगर) यांच्यावर गोळीबाराची घटना घडली आहे. गोळी झाडल्यानंतर ती काचेवर बसून काच फुटून तरुण किरकोळ जखमी झाला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेकायदेशीर व्यवसाय व रियल इस्टेट व्यवसायातून हा गोळीबार झाल्याचे प्राथमिक तपासातून दिसून येते. (Belgaum Crime News)
प्रफुल पाटील हा बेळगुंदीकडून पहाटेच्या सुमारास बेळगावला येत होता. यावेळी त्याच्या कारच्या आडवे दुसरे वाहन लावत कार थांबवली. प्रफुल बसलेल्या बाजूला हल्लेखोरांनी काचेवर गोळी झाडली. यामुळे कारची काच फुटून काचेचे तुकडे चेहऱ्याच्या उजव्या बाजूला कानावर लागून ते किरकोळ जखमी झाले आहेत. (Belgaum Crime News)
यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वडगाव पोलिसांकडून तपास सुरू आहे. परंतु, पाठीमागील संदर्भ लक्षात घेता शहर परिसरात चालणारे मटका, जुगाराचे बेकायदेशीर अड्डे व रियल इस्टेट व्यवसायातील स्पर्धा यातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येते.