

बेळगाव : यमकनमर्डी येथील मोरारजी देसाई शाळेत आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिडकल डॅममध्ये बुडून मृत्यू झाला. कार्तिक मंजुनाथ गाडीवडर (वय 14 रा. कोण्णूर, ता. गोकाक) असे मृताचे नाव आहे.
यमकनमर्डी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कार्तिक व शाळेतील त्याचे दोघे मित्र सिद्धू मुद्देपगोळ व आकाश नाईक असे तिघेजण हिडकल डॅम चिकोडी डावा कालवा येथे पोहण्यासाठी गेले होते. आकाश हा काठावर पोहत असताना कार्तिक व सिद्धू हे दोघे पुढे गेले. ते बुडू लागल्यानंतर काठावरील आकाशने आरडाओरड केली. यावेळी येथे आलेल्या काहींनी सिद्धूला वाचवले. परंतु, कार्तिक आतील बाजूस ओढला गेल्याने बुडाला. या प्रकरणाची नोंद यमकनमर्डी पोलिस स्थानकात झाली आहे.