

बेळगाव : विद्यार्थ्यांच्या शालेय सुट्टीला सोमवारी दुर्घटनेने प्रारंभ झाला. सुट्टी सुरू झाल्याने वाढत्या उन्हात थंडावा म्हणून हिडकल धरणात पोहण्यास गेलेल्या पाचपैकी दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. हुक्केरी तालुक्यातील गुडगनट्टी येथील ब्रह्म मंदिराजवळील सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
कृष्णा विठ्ठल खानापुरी (वय 14) व प्रज्वल मुत्तुेप्पा गोकर (14, दोघेही रा. दादबानट्टी, ता. हुक्केरी) अशी मृत मुलांची नावे आहेत. त्यांच्यासोबत गेलेले मुत्तूराज बकुळ गस्ती (14), सिद्धार्थ बसवराज पनगुद्दी (14) व मंजुनाथ तम्माण्णा पात्रोट (14, तिघेही रा. दादबानट्टी) हे वेळीच पात्राबाहेर आल्याने वाचले आहेत.
अधिक माहिती अशी : कृष्णा व प्रज्वल हे आरसी गुडगनट्टी येथील प्राथमिक कन्नड शाळेत सातवीत शिकत होते. सोमवारी महावीर जयंतीची सुट्टी असल्याने या दोघांचे पोहायला जाण्याचे नियोजन ठरले. जाताना त्यांनी त्यांचे अन्य तिघे सहकारी मुत्तूराज, सिद्धार्थ व मंजुनाथलाही सोबत घेतले. हे सर्वजण सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास जुन्या गुडगट्टी येथील ब्रह्म मंदिराच्या पूर्वेला असलेल्या हिडकल डॅमच्या बॅकवॉटरमध्ये पोहण्यासाठी उतरले.
दोघे बुडाले, तिघे बाहेर
पाचहीजण आधी एकाच ठिकाणी पोहत होते. परंतु, कृष्णा व प्रज्वल पोहत पुढे गेले. त्यांच्या मागे उर्वरित तिघे होते. मात्र दोघेजण काहीसे पुढे गेल्यानंतर बुडायला लागले. हे पाहून घाबरलेले अन्य तिघेजण तेथूनच माघारी फिरले व काठावर पोचले आणि त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे नजीककचे काही लोक धावून आले. त्यांनी घटनाी माहिती पोलिसांना दिली.
पोलिस, अग्निशामक दल
मुले बुडाल्याची माहिती मिळताच यमकनमर्डीचे पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र बुडालेल्या दोघांना शोधणे आव्हानात्मक असल्याने त्यांनी अग्निशामक दलाला बोलावून घेतले. अग्निशामक जवानांनी बुडालेल्या मुलांचा शोध सुरू केला. दुपारी दीडच्या सुमारास कृष्णा व प्रज्वलचे मृतदेह सापडले. निरीक्षक मुशापुरी अधिक तपास करीत आहेत.