

बेळगाव : पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाई तीव्र केली असून तीन लाखांचे हेरॉईन जप्त करुन एकाला अटक केली. तर दुसऱ्या एका घटनेत ५१ हजाराचा गांजा जप्त करत तिघांना अटक केली. हेरॉईनची कारवाई सीसीबीने व काकती पोलिसांनी गांजा प्रकरणी कारवाई केली.
शिवप्रसाद महादेव जोशी (वय २१, रा. देवराज अर्स कॉलनी, बेळगाव) हा तरुण बसवण कुडची येथील केएचबी बास्केट बॉल कोर्टजवळ अमली पदार्थ विकत असल्याची माहिती सीसीबीचे निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन छापा टाकला असता तो रंगेहाथ सापडला. त्याच्याकडे १५ ग्रॅम हेरॉईन सापडले असून याची किंमत तीन लाख रुपये होते. त्याच्याकडून ५ हजारांचा मोबाईलही जप्त केला. त्याची अधिक विचारपूस केली असता त्याने हे हेरॉईन मॅडी ऊर्फ विनायक (रा. बेळगाव) याने आपल्याला विक्रीसाठी दिल्याचेही कबूल केले. त्याने ते मुंबईतील अम्मा नामक महिलेकडून आणल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे, या तिघांवर माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
काकती पोलिसांनी तिघांना अटक करुन त्यांच्याकडून ५१ हजारांचा ७७९ ग्रॅम गांजा व तीन लाखांची कार असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या संशयितांमध्ये भूषण धाकलू बाळेकुंद्री (वय २२, रा. बसवाण गल्ली, म्हाळेनट्टी), आदित्य मनोहर कांबळे (२२, रा. आंबेडकर गल्ली, उचगाव) व प्रशांत लक्ष्मण खांडेकर (१९, रा. मारुती गल्ली, शिनोळी, ता. चंदगड जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. काकती पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून निरीक्षक सुरेश शिंगे तपास करीत आहेत.