Belgaum Accident: रस्त्याकडेचा ट्रक-पहाटेच्या डुलकीने घात

दोघे ठार, चालक जखमी : हलग्याजवळ अपघातात शेकडो कोंबड्यांचाही मृत्यू
Belgaum Accident
Belgaum AccidentPudhari
Published on
Updated on

बेळगाव : पहाटेच्या वेळी आलेली ड़ुलकी आणि महामार्गावर थांबलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने कोबंड्यावाहू टेम्पोची ट्रकला धडक बसली. ती इतकी जोरदार होती टेंपोतील तिघांपैकी दोघे जागीच ठार झाले, तर चालक जखमी झाला. शिवाय हौद्यातील शेकडो कोंबड्यांचाही मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावरील हलगा गावच्या हद्दीतील गुरूसिद्धेश्वर स्वीट मार्टजवळ मंगळवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास हा अपघात घडला.

वासीमआक्रम मुक्तीयार बाशा (वय 28) व मुबारक मकबूलसाब (वय 22, दोघेही रा. कुक्कपेठ, ता. सोरब, जि. शिमोगा) अशी मृतांची नावे आहेत. टेम्पोचालक बसवराज इराप्पा हंचीनमणी (वय 37, रा. मुगळीकोप्प, जि. शिमोगा) हा जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हिरेबागेवाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सदर टेम्पो कोल्हापूर जिल्ह्यातून कोंबड्या भरून बेळगावमार्गे शिमोगाकडे निघाला होता. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास अलारवाड ब्रीजजवळ पाचच मिनिटे आधी अवजड ट्रक महामार्गावर थांबला होता. बसवराज टेम्पो चालवत होता तर अन्य दोघेजण झोपले होते.

पहाटेची वेळ व झोप येत असल्याने बसवराजला समोर थांबलेल्या ट्रकचा अंदाज आला नाही. त्यामुळे टेम्पोने ट्रकला मागून जोराची धडक दिली. त्याबरोबर झोपेत असलेले दोघेजण जागीच ठार झाले, तर चालक बसवराज हा थोडासा बाजूला सरकल्याने वाचला. त्याला दुखापत झाली असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे हिरेबागेवाडी पोलिसांनी सांगितले. धडक इतकी जोरदार होती की टेम्पोचा पुढील भाग चेपून पाठीमागे असलेल्या कोंबड्यांच्या लोखंडी ज़ाळीलाही जोराचा धक्का बसला. दोन्ही बाजूंनी जाळी तुटून यातून असंख्य कोंबड्या बाहेर फेकल्या गेल्या, काही कोंबड्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. जेसीबीच्या सहाय्याने ट्रकमध्ये अडलेला टेम्पो बाहेर काढला. जखमी व त्याच्या बाजूला दोन्ही मृतदेह अडकले होते. जखमीला बाहेर काढून रूग्णालयात नेले. दोघांचे मृतदेहही बाहेर काढून ते उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयाच्या शवागाराकडे पाठवण्यात आले. हिरेबागेवाडी पोलिसांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत बसवराजवर तसेच चुकीच्या पद्धतीने महामार्गावर अवजड वाहन थांबवणाऱ्या वाहन चालकावरही गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news