

बेळगाव : ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, समस्यांवर तोडगा काढणे आणि विविध सरकारी योजनांविषयी जनजागृती करणे या उद्देशाने खानापूर तालुक्यातील ग्राम पंचायतींमध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात २,८३१ ग्रामस्थांनी सहभाग घेऊन गावचा विकास व विविध सरकारी योजनांविषयी माहिती मिळवली.
विशेष ग्रामसभांमध्ये व्हीबी-जी रामजी योजनेबद्दल विशेष माहिती देण्यात आली. २०२७-२८ साठी कृती आराखडा तयार करणे, ग्रामपंचायत हद्दीत हाती घेता येतील अशा कामांची निवड करणे, गावांच्या गरजेनुसार प्राधान्यक्रम ठरवणे आणि लोकांकडून विकासकामांच्या मागण्या स्वीकारणे हा ग्रामसभांमागचा उद्देश होता. योजनेंतर्गत नियमांनुसार करता येतील, अशी वैयक्तिक आणि सामुदायिक कामे, जलसंधारण, मृदा संवर्धन, नैसर्गिक संसाधन विकास आणि ग्रामीण पायाभूत सुविधांशी संबंधित कामांबद्दल जागरुकता निर्माण करण्यात आली. ग्रामस्थांना व्हीबी-जी रामजी योजनेंतर्गत रोजगारासाठी अर्ज करण्याची पद्धत, जॉब कार्ड मिळवण्याची प्रक्रिया, योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी, वेतन देण्याच्या पद्धती, डीबीटी आणि योजनेचा लाभ घेताना पाळायच्या नियमांविषयी माहिती देण्यात आली.
ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, सांडपाणी व्यवस्था, स्वच्छता, घरे आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या आणि गरजा विशेष ग्रामसभांमध्ये मांडण्यास सांगण्यात आले. गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेली कामे निवडणे आणि त्यासंबंधी योग्य मागण्या व सूचना सादर करून नियोजन प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
खानापूर तालुक्यात आयोजित विशेष ग्रामसभांमध्ये २,८३१ गावकऱ्यांनी सहभाग घेतला, यामुळे ग्रामीण विकास आणि सरकारी योजनांविषयी माहितीच्या आदान-प्रदानाची संधी मिळाली. ग्रामस्थांच्या मागण्या आणि स्थानिक गरजांच्या आधारे पुढील वर्षाचा कृती आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेत लोकांच्या सहभागाला महत्त्व देण्यात आले. जनतेने आपल्या गावाच्या विकासकामांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे, सरकारी योजनांच्या सुविधांविषयी माहिती मिळवावी आणि त्यांचा चांगला उपयोग करुन घ्यावा, असा संदेश देण्यात आला.